
ड्रग्ज रॅकेटला जोरदार दणका; ग्रामीण भागातून चालणाऱ्या नेटवर्कवरही पोलिसांची करडी नजर
पुणे ग्रामीण पोलिसांनी पेशाने गॅरेज चालक असलेल्या एकाला पकडून त्याच्याकडून तब्बल एक किलो मेफेड्रोन (एमडी) ड्रग पकडले. तिथेच न थांबता पोलिसांनी पुढील साखळी पकडून त्याला पुरवठा करणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन एजंटांना देखील पकडले. याच प्रकरणात अहिल्यानगर पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलिसाचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. हे रॅकेट मोठ्या प्रमाणात पसरल्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातूनच पुणे शहरात आणि इतर शहर व जिल्ह्यात तसेच परराज्यात देखील त्याचा पुरवठा होत असल्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ग्रामीण भागातून देशात पसरलेल्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर पुणे पोलिसांनी राबविलेल्या कारवायांचा लेखाजोखा पाहिला असता, गेल्या वर्षात ड्रग्जविरोधात सर्वाधिक कठोर आणि प्रभावी कारवाई झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे पोलिसांनी गेल्या वर्षात पाच वर्षांमधील उच्चांकी कारवाई केली आहे. २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उघड केले. त्यात तब्बल ३६०० कोटींचे ड्रग्ज पकडले. नंतर पुण्यातील छोट्या विक्रेत्यांपासून इतर जिल्ह्यातील काही एजंटची नावे समोर आणत त्यांच्यावर जोरदार कारवाई सुरू केली. त्यावेळपासून पुण्यातील ड्रग्जचा पुरवठा कमी झाल्याचा दावा पुणे पोलिसांकडून करण्यात येतो.
पुणे पोलिसांनी वर्षभरात (२०२५) तब्बल २१५ गुन्हे नोंदवले असून, ३१९ ड्रग्ज एजंट्सना जेरबंद केले आहे. गेल्या ५ वर्षांच्या तुलनेत ही कारवाई संख्येनेच नव्हे, तर परिणामकारकतेच्या दृष्टीनेही विक्रमी ठरली आहे.
हे सुद्धा वाचा : ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, पोलीसाचाही सहभाग; कोट्यवधीचा मुद्देमाल सापडला