
डीडी वठवून ९ लाखांची फसवणूक
छत्रपती संभाजीनगर : फ्लॅट खरेदीसाठी घेतलेल्या गृहकर्जाची रक्कम फेडण्यासाठी दिलेला ९ लाखांचा डीडी कंपनीकडे जमा न करता फसवणूक करण्यात आली. हा डीडी कंपनीच्या कलेक्शन मॅनेजरसह त्याच्या साथीदाराने परस्पर वटवून घेऊन फसवणूक केली. हा प्रकार ४ मे २०२३ ते २ ऑगस्ट २०२५ दरम्यान घडला.
कलेक्शन मॅनेजर भारत गायकवाड व त्याचा एक साथीदार अशी फसणूक करणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात आमिनाबी सलीम शेख (४९, रा. एस. के. प्राईड, बीड बायपास) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, आमिनाबी शेख यांनी १८ एप्रिल २०१७ रोजी मौजे सातारा येथील गट क्रमांक ३६ पैकी प्लॉट क्रमांक ४१-सी वरील एस. के. प्राईड इमारतीतील ४९.३७ चौ.मी. कार्पेट एरियाचा फ्लॅट १४ लाख ८० हजार रुपयांना खरेदी केला होता.
हेदेखील वाचा : New Year Scam: नवीन वर्षाच्या शुभेच्छा पडू शकतात महाग! ‘या’ मेसेजपासून राहा सावध; नाहीतर एका क्लिकवर बँक खाते होईल रिकामी
या खरेदीसाठी अॅस्पायर होम फायनान्सकडून तेवढ्याच रकमेचे कर्ज घेतले होते. सुरुवातीची दोन वर्षे कर्जाचे हप्ते भरल्यानंतर २०१९ पर्यंत एकूण २७ हप्ते त्यांनी फेडले होते. त्यानंतर उर्वरित रकमेपैकी एक लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्टही कंपनीकडे दिल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
कोरोना काळात काही हफ्ते थकित
कोरोनाच्या काळात काही हप्ते थकले. या काळात कंपनीचे कलेक्शन मॅनेजर भारत गायकवाड याने वारंवार फोन केले. नोटीस पाठवली, घरी येऊन शिवीगाळ देखील केली. या वादानंतर ४ मे २०२३ रोजी त्याच्या सांगण्यावरुन अॅस्पायर होम फायनान्सच्या नावाने ९ लाख रुपयांचा डीडी तयार करण्यात आला.
हा डीडी आमिनाबी यांच्या मावस भाऊ आशपाक खान सरदार खान याच्या खात्यातून काढून भारत गायकवाड याने बुलेटवर पाठवलेल्या एका व्यक्तीकडे देण्यात आला. यानंतर अनेक महिने संपर्क झाला नाही. मात्र, १८ जानेवारी २०२४ रोजी पुणे येथील अॅस्पायर होम फायनान्सचे अधिकारी फ्लॅटवर आले असता, कर्जफेड झालेली नसल्याचे सांगण्यात आले.
फ्लॅट केला सील…
१० जून २०२४ रोजी कंपनीच्या जनरल मॅनेजरने फ्लॅट सील केला. आपण नऊ लाखांचा डीडी दिल्याचे सांगितल्यावर, ती रक्कम कंपनीच्या खात्यात जमा झालेली नसल्याचे आणि संबंधित कलेक्शन मॅनेजर भारत गायकवाड याला कामावरुन कमी केल्याचे सांगण्यात आले. तसेच ते पैसे तुम्ही त्यांच्याकडूनच घ्या, असे उत्तर कंपनीकडून देण्यात आल्याचे देखील फिर्यादीत नमूद करण्यात आले.