पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी सापळा रचून पकडले
पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून, गोळीबार, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यासाठी पोलीसदेखील प्रयत्न करत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
सोपान सावंत उर्फ सोप्या सरकार (वय २३, रा. गांधनखिळा वस्ती, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई अमोल गायकवाड यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या महितीनुसार, सोपान सावंत रविवारी (२२ जून) दुपारी दोनच्या सुमारास येरवड्यातील गुंजन चित्रपटगृहाजवळ थांबला होता. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. नंतर पोलिसांनी सापळा लावून सावंतला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली. सावंतने पिस्तूल कोणाकडून आणले, तसेच कोणाला विक्री करणार होता, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक सुर्वे अधिक तपास करत आहेत.