
बेशिस्त वाहनचालकांना पुणे पोलिसांचा दणका; गेल्या तीन वर्षातील आकडेवारी वाचा सविस्तर
कारवाईमुळे शहरातील बेशिस्त वाहनचालकांना काही प्रमाणात तरी लगाम बसल्याचे चित्र आहे. ही कारवाई अशाच पद्धतीने सुरू राहणार असल्याचेही पुणे पोलिसांनी स्पष्ट केले. पुणे शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी विशेष प्रयत्न केले. या प्रयत्नांमुळे शहरातील वाहतूकीचा वेग वाढला व एका संस्थेच्या अहवालानुसार सातव्या क्रमांकावरून पुण्याच्या वाहतूक कोंडीत पाचवा क्रमांक आला. त्यामुळे वाहतूक गेल्या काही महिन्यांमध्ये सुधारली आहे. वाहन चालकांना कोंडीत अडकून पडावे लागत नसल्याचे चित्र आहे.
यासोबतच पोलिसांनी शहरातील प्रमुख चौक, वर्दळीचे रस्ते, शाळा–महाविद्यालय परिसर, बाजारपेठा व रहिवासी भागांमध्ये वाहतूक पोलिसांनी विशेष मोहिमा राबवत नियमभंग करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई केली. अनेक ठिकाणी अचानक तपासणी (विशेष मोहिम) करून नियम मोडणाऱ्यांवर दंड, वाहन जप्ती तसेच परवाना निलंबनाची कारवाई केली. विशेषतः ट्रिपलशीट आणि राँग साईडमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या लक्षात घेता या प्रकारांवर ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविण्यात आले.
मोहिमेमुळे अनेक वाहनचालकांमध्ये भीती निर्माण झाल्याचे चित्र आहे. “दंड भरून मोकळे होण्यापेक्षा नियम पाळणेच सुरक्षित” अशी जाणीव आता हळूहळू नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही नियमांकडे दुर्लक्ष करणारे चालक आढळत असल्याने पोलिसांनी ही कारवाई सातत्याने सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या तीन वर्षातील आकडेवारी…
२०२३
ट्रिपल शीट- (२२०८७), नो-एंट्री (२१११०), राँग साईड ड्रायव्हिंग (१४४३१), धोकादायकरित्या वाहन चालविणे (६८९), ड्रंक अँड ड्राईव्ह (३८४), मोबाईल टॉकींग (११८७८), फुटपाथवर पार्किंग (५३२), फुटपाथवरून वाहन चालविणे (५६१), सिग्नल जंपींग (६६६४८)
२०२४
ट्रिपल शीट- (४८४७९), नो-एंट्री (१७८१०४), राँग साईड ड्रायव्हिंग (२६६४१), धोकादायकरित्या वाहन चालविणे (८६८६), ड्रंक अँड ड्राईव्ह (५२८६), मोबाईल टॉकींग (२४७४३), फुटपाथवर पार्किंग (२३०९), फुटपाथवरून वाहन चालविणे (३२८२), सिग्नल जंपींग (७१८४१)
२०२५
ट्रिपल शीट- (६८९४०), नो-एंट्री (५०१६६७), राँग साईड ड्रायव्हिंग (४३९४९), धोकादायकरित्या वाहन चालविणे (५८८९), ड्रंक अँड ड्राईव्ह (६२८१), मोबाईल टॉकींग (४१९६१), फुटपाथवर पार्किंग (२०५४), फुटपाथवरून वाहन चालविणे (९६९४), सिग्नल जंपींग (१७१२०२)