गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल सात हजार कर्मचारी असणार तैनात
पुणे : यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांनी कायदा सुव्यवस्था आणि सुरळीत वाहतुकीसाठी सात हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. यंदा पुणे पोलिसांनी यासोबतच तंत्रज्ञानाचा देखील मोठा वापर केला आहे. त्यामध्ये ५० मेटल डिटेक्टर गेटस्, १५० हँड हेल्ड डिटेक्टर बसविणे, मेट्रो स्थानक परिसरात गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा, दंगा नियंत्रण प्रात्यक्षिके, अशा ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवाला (दि. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर) बुधवारपासून सुरूवात होत आहे. या काळात पुण्यात मोठा उत्साह असतो. यंदा ३९५९ सार्वजनिक मंडळे गणेशोत्सव साजरा करत आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे, पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, हिंमत जाधव आणि डॉ. संदीप भाजीभकरे उपस्थित होते.
अत्याधुनिक उपाययोजना
यंदाच्या गणेशोत्सवात नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहेत. पुणे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सर्व्हेलन्स कॅमेऱाज् बसवले जाणार असून, एआय व्हिडिओ ॲनॅलिटिक्सच्या मदतीने संशयास्पद हालचालींवर तत्काळ कारवाई होणार आहे. यासोबतच आयपी-बेस्ड पब्लिक ॲड्रेस सिस्टिमद्वारे गर्दी नियंत्रण व तातडीच्या सूचना दिल्या जातील.
राज्य महोत्सव; पोलिस बँडचे होणार वादन
राज्य शासनाच्या निर्णयानुसार यंदा गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होणार आहे. यानिमित्ताने काही चौकांमध्ये विद्युत रोषणाई, पोलिस वादन तुकडीचे (पोलिस बँड) सादरीकरण तसेच पोलिस श्वानांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.
इतर उपाययोजना
असा आहे पोलिस बंदोबस्त
पोलिस अंमलदार – ६२८६
पोलिस उपायुक्त – १०
सहाय्यक आयुक्त – २७
पोलिस निरीक्षक – १५४
शीघ्र प्रतिसाद पथके – १६
विशेष पथके – १४
स्फोटक शोध पथके -७
गृहरक्षक दल – ११००
एक राखीव पोलिस पथक तैनात होणार आहे.