
जामखेडनंतर सासवडमध्येही एकाचा खून; पुणे ग्रामीण पोलिसांकडून दुहेरी खूनाचा उलगडा
सुरज प्रकाश बलराम निषाद (वय ३४, रा. छत्तीसगड), नीरज ओम प्रकाश गोस्वामी (वय २५, रा. मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. ही कारवाई पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस निरीक्षक कुमार कदम, सहायक निरीक्षक वैभव सोनवणे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
सासवड शहरातील न्यू आनंद वाईन्सच्या मागील बाजूस सुरू असलेल्या बांधकामाच्या इमारतीत जिन्याखाली राजू दत्तात्रय बोराडे (३८, रा. सासवड, ता. पुरंदर) यांचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. खून अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आल्याने या घटनेने सासवड हादरून गेले. सासवड व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस गुन्ह्याचा तपास करत होते. घटनेचे गांभीर्य ओळखून अधिक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी आरोपींना पकडण्याच्या सूचना केल्या होत्या. पथकाने घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मृत व्यक्तीसोबत दोन अनोळखी व्यक्ती घटनास्थळाकडे जात असल्याचे दिसले. या फुटेजवरून तपासाची दिशा ठरल्यानंतर संशयितांचा शोध कोंढवा, हडपसरसह विविध भागांत पथकाने घेतला.
दरम्यान, सासवडमधील आनंद वाईन्स येथे दारू खरेदीसाठी आलेला संशयित इसम पोलिसांच्या नजरेत आला. चौकशीत त्याने सुरज प्रकाश बलराम निषाद असे नाव सांगितले; मात्र त्याची उत्तरे विसंगत होती. अधिक चौकशी केल्यानंतर निषादने साथीदार नीरज गोस्वामी याच्यासह खून केल्याची कबुली दिली. नंतर गोस्वामीला ताब्यात घेतले. दोन्ही आरोपी दारूच्या नशेत असताना वाद वाढत गेले आणि त्यातूनच त्यांनी हा खून केल्याचे समोर आले आहे.
चौकशीदरम्यान गोस्वामीने काही आठवड्यांपूर्वीच जामखेड येथे पैशांच्या वादातून विकास मधुकर अंधारे (वय २२) याचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्या घटनेनंतर तो पुणे जिल्ह्यात कामाच्या शोधात आला आणि सासवडमध्ये दारूच्या वादातून दुसर्या खुनाची घटना घडवून आणली. आता या फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी पकडले.