
गोध्रातील टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका; तिघांना ठोकल्या बेड्या
इरफान अब्दुलअमीद दुर्वेश (वय ४२), मोहम्मद अली हुसेन रेहमत (वय २१) आणि उमर फारूख अब्दुलसत्तार जाडी (वय ३६, रा. गोध्रा, गुजरात) अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई पुणे ग्रामीण अधीक्षक संदिपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश शिळीमकर, खेड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. गुजरातमधील पंचमहल जिल्हा तसेच महाराष्ट्रातील आळेफाटा, मंचर, सिन्नर इत्यादी ठिकाणी चोरी, दरोडा आणि तत्सम गुन्ह्यांमध्ये त्यांचा समावेश असल्याचे आढळून आले आहे.
कोंढापुरीतील ट्रकमधून टायर चोरी केल्याचेही निष्पन्न
तपासादरम्यान या आरोपींनी १४ नोव्हेंबरला शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोंढापुरी येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ ट्रकमधून सव्वापाच लाख रुपये किमतीचे टायर चोरी केल्याचे उघड झाले आहे. याबाबत शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. दरोडा करण्याच्या तयारीत आढळल्यामुळे खेड पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक महेश गरड करत आहेत.
ट्रकची बॅटरी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या
बारातामतीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. बारामती एमआयडीसी परिसरातील कल्याणी ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी कंपनीसमोर उभ्या असलेल्या ट्रकची बॅटरी चोरून लंपास करणाऱ्या चोरट्याला बारामती तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणारे जनार्धन रघुनाथ रांधवन (वय-३१) यांचा (एम.एच.१४ डी. एम ९१८१) क्रमांकाचा टाटा ११०९ ट्रक हा (दि.२५ रोजी) सकाळी कल्याणी कंपनीसमोर पार्क केला होता. दुसऱ्या दिवशी (दि.२६ रोजी) सकाळी ते ट्रककडे गेले असता ट्रक सुरू होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खाली उतरून पाहणी केली असता बॅटरीची वायरी तुटलेल्या अवस्थेत व बॅटरी गायब असल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ परिसरात शोध घेतला, मात्र बॅटरीचा काहीच मागमूस न मिळाल्याने त्यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चोरी गेलेली बॅटरी सुमारे दहा हजार रुपये किमतीची आहे. तक्रार नोंदताच पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले. सीसीटीव्ही फूटेज, परिसरातील हालचाली आणि मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित शिवम प्रेमप्रकाश यादव (रा. घाडगे वस्ती, एमआयडीसी बारामती) याला ताब्यात घेतले.