
Crime News: गणेशोत्सवात अवैध मद्यविक्रीला उत्पादन शुल्क विभागाचा दणका ; सात दिवसांत ४५ गुन्हे दाखल
अलिबाग: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील अवैध मद्यविक्री आणि हातभट्टी दारूला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम राबवली. १४ ते २० सप्टेंबर २०२६ या सात दिवसांत जिल्हाभरात करण्यात आलेल्या कारवाईत ४५ गुन्हे दाखल करून २८ आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत ९ लाख ७ हजार ८६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गणेशोत्सवात मोठ्या संख्येने भाविकांची ये-जा, सार्वजनिक मंडळांचे कार्यक्रम आणि विविध ठिकाणी होणाऱ्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात विशेष लक्ष केंद्रित केले होते. हातभट्टी दारू निर्मितीची ठिकाणे, अवैध मद्यविक्री केंद्रे तसेच मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर पथकांनी कारवाई केली.
हेही वाचा: Crime News: एकतर्फी प्रेमातून तरुणीचा छळ; पाठलाग, धमकी अन् घरात घुसून तरुणीवर…
या मोहिमेत ४२२ लिटर गावठी दारू आणि तब्बल १४ हजार ६०० लिटर रसायन जप्त करण्यात आले. याशिवाय ५९.५८ बल्क लिटर देशी मद्य आणि ६०.१८ बल्क लिटर विदेशी मद्यही जप्त करण्यात आले. अवैध मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे एक वाहनही विभागाने ताब्यात घेतले.
गणेशोत्सव काळात अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी विशेष पथकांच्या माध्यमातून तपासणी आणि कारवाई करण्यात आली. उत्सव काळात बेकायदेशीर मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतूक होऊ नये, यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा: Crime News: यूएईत भारतीयाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे नऊ तुकडे करून बॅगमध्ये भरले अन्…
रायगडमध्ये बनावट मद्य, शासनाचा कर किंवा उत्पादन शुल्क चुकवून होणारी मद्यविक्री तसेच हातभट्टी दारूची निर्मिती, वाहतूक किंवा विक्री याबाबत माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १८०० २३३ ९९९९ या टोल-फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.