सौजन्य फोटो - सोशल मिडीया
मुजफ्फरपूर: बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीचा छळ करून तिच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मोतीपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. बिहार पोलिसांच्या शिपाई भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीने गावातील रवि कुमार या तरुणावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या १५ ते २० दिवसांपासून तो आपला पाठलाग करून बोलण्यासाठी दबाव आणत असल्याचे तरुणीने पोलिसांना सांगितले.
तरुणी शारीरिक क्षमता चाचणीच्या तयारीसाठी नियमित धावण्याचा सराव करते. मंगळवारी धावण्याचा सराव करून ती घरी परतत असताना दरिया छपरा पोखर परिसरात रवि कुमारने तिला रस्त्यात अडवले. त्याने एकतर्फी प्रेमाचा दबाव टाकल्याचा आरोप तरुणीने केला आहे. तिने विरोध केल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. यावेळी शिवीगाळ आणि मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा: Crime News: यूएईत भारतीयाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे नऊ तुकडे करून बॅगमध्ये भरले अन्…
या प्रकारादरम्यान काही नागरिक घटनास्थळी पोहोचल्याने रवि तेथून निघून गेला. त्यानंतर तरुणी घरी पोहोचली. मात्र, रवि तिचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचल्याचा आरोप आहे. घराजवळ पुन्हा वाद झाला. यावेळी रविने चाकू काढून तरुणीच्या डोक्यावर वार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. हल्ल्यात तरुणी जखमी झाली.
तरुणीने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी येऊ लागले. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी तरुणीला उपचारासाठी मोतीपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. उपचारानंतर तिने मोतीपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीत तरुणीने आरोपीवर छेडछाड करण्यासोबतच बलात्काराची धमकी दिल्याचाही आरोप केला आहे. तसेच आरोपी तिच्या वडिलांना आणि भावाला जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोपही तिने केला आहे. या सर्व आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
मुजफ्फरपूरच्या पश्चिम विभागाच्या डीएसपी सुचित्रा कुमारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला रस्त्यात अडवून मारहाण केल्याचा आणि त्यानंतर घराजवळ येऊन पुन्हा मारहाण करून चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.






