
संभाजीनगर पुन्हा हादरले! तरुणाचा तलवारीने खून (Photo Credit - X)
मृत तरुणाचे नाव समीर खान इनात खान उर्फ मालेगाव (वय ३०, रा. चेलीपुरा) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या पूर्ववैमनस्यातून व सूडबुद्धीने झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण तीन दिवसांपूर्वीच समीर खान यांच्यावर चाकू हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास समीर खान निशान दर्गा परिसरात उभा असताना, चार जण तेथे आले. त्यापैकी तिघांनी तोंडाला रुमाल, उपरणे किंवा शाल बांधलेली होती, तर चौथा साथीदार टेहळणी करत होता. या तिघांनी अचानक तलवारीसारख्या धारदार हत्याराने समीरवर सपासप वार केले. एका आरोपीने त्याचा गळा चिरला, तर दुसऱ्याने चाकूने भोसकले. केवळ ३० ते ३२ सेकंदांत हल्ला करून सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या समीरला पाहून नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.
सायंकाळी ५ वाजता समीर खान यांना त्यांचा मित्र शारेक बाली याचा फोन आला. त्याला भेटण्यासाठी समीर खान घरातून दुचाकीवरून (एमएच-२०-जीडी-४०५८) निघाले होते. घटनेनंतर शारेक बाली यानेच समीर यांच्या पत्नीला फोन करून सांगितले की, “भाभी, समीरला तीन-चार जणांनी हत्याराने मारले.” समीर यांची पत्नी सना यांनी शहाबाजार सिटीझन हॉस्पिटलसमोरील गल्लीत धाव घेतली असता, त्यांचे पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. तेथे उपस्थित शारेक बाली याने शोएब काला, ईसरार खान, नसिर उर्फ ईंता आणि असलम चाऊस यांनी तलवारीने हल्ला केल्याचे सांगितले.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. तपासचक्रे फिरवत खबऱ्याच्या मदतीने पोलिसांनी रात्री उशिरा पाचही आरोपींना ताब्यात घेतले.
समीर खान यांची पत्नी सना खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती शहागंज मंडी परिसरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होते. २८ ऑक्टोबर रोजी शोएब अन्वर खान याने समीर खान व त्यांचा साथीदार शाहरुख यांच्यावर शस्त्राने हल्ला केला होता, ज्याचा गुन्हा सिटीचौक पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यानंतर २९ ऑक्टोबर रोजी समीर यांनी आसिफ रायडर, हफिज उर्फ टकला आणि शोएब काला या तिघांविरुद्ध शिवीगाळ, मारहाण व धमकीची दुसरी तक्रार दिली होती.
याच जुन्या तक्रारीचा राग मनात धरून व सूडबुद्धीने आसिफ रायडर, शोएब काला, ईसरार खान, नसिर उर्फ ईंता आणि असलम चाऊस या पाच जणांनी एकत्र येत पती समीर खान यांच्यावर तलवारीने हल्ला करून त्यांचा खून केल्याचे सना यांनी फिर्यादीत स्पष्ट केले आहे. सर्व आरोपींना आज सकाळी कोर्टात हजर केले जाणार आहे.
Mumbai Airport: मुंबई विमानतळावर मोठी कारवाई: DRI कडून 47 कोटींचं कोकेन जप्त, पाच जण अटकेत!