
महापौर निवडणुकीची तारीख ठरली! 'या' दिवशी होणार मतदान (photo Credit- X)
महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांना ४ व ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नामांकन पत्रांचे वितरण केले जाणार आहे. तसेच ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामांकन पत्रे उपलब्ध करून दिली जातील. याच दिवशी म्हणजे ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नामांकन पत्रांची स्वीकृती करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता नामांकन स्वीकारण्याची अंतिम मुदत राहणार असून, त्यानंतर कोणतेही नामांकन स्वीकारले जाणार नाही. नामांकन पत्रे महापालिका सचिव व त्यांच्या कार्यालयात स्वीकारली जातील.
विशेष सभेतच तपासणी आणि नामवापसी निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेली नामांकन पत्रांची तपासणी १० फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या विशेष सभेतच करण्यात येणार आहे. सभेच्या सुरुवातीला पीठासीन अधिकारी नामांकन पत्रांची तपासणी करतील, तपासणीनंतर वैध उमेदवारांची नावे सभागृहात वाचून दाखविण्यात येतील. त्यानंतर उमेदवारांना नामवापसीसाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे.
महापौर व उपमहापौर पदासाठी १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा महानगरपालिकेच्या सभागृहात होणार आहे. या सभेत प्रथम महापौर पदाची निवडणूक पार पडेल. त्यानंतर उपमहापौर पदासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येईल. दोन्ही पदांच्या निवडणुका एकाच सभेत पूर्ण केल्या जाणार आहेत.
महापौर-उपमहापौरपदासाठी सोमवारी १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता निवडणुक प्रक्रिया सुरु होणार आहे. यात सर्व प्रक्रिया झाल्यानंतर मतदान प्रक्रिया ही हात उंचावूनच केली जाणार आहे. पहिल्यांदा महापौरपदासाठी तर नंतर उपमहापौर पदासाठी मतदान होणार आहे. महापालिकेतील सर्वाधिक जागा जिंकलेला पक्ष हा भाजप आहे. त्यांचे ५७ नगरसेवक विजयी झाले आहेत. या पक्षाकडून येत्या ५ फेब्रुवारीनंतरच गटाची नोंदणी होणार आहे.
१० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेदरम्यान नवनिर्वाचित नगरसेवकांनी फोटोयुक्त ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक राहणार आहे. ओळखीसाठी भारत निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किया वाहनचालक परवाना यापैकी कोणतेही एक वैध ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे.