
‘मुलगी वाईट वळणावर होती’ म्हणाले वडील; शेजाऱ्यांनी सांगितली उलटीच कहाणी, सातारा हत्याकांडात नवा ट्विस्ट
सातारा: साताऱ्यात १७ वर्षीय मुलगी आर्या पुरुषोत्तम कदम हिच्या हत्येप्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घरातील वादानंतर संतापाच्या भरात वडील पुरुषोत्तम कदम यांनी मुलीच्या डोक्यात क्रिकेट बॅटने प्रहार केल्याचा आरोप असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सुरुवातीला प्रकरणाच्या घटनाक्रमाबाबत वेगवेगळे दावे समोर आल्यानंतर आता वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबातील कारणांवरूनही प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलिसांच्या चौकशीत पुरुषोत्तम कदम यांनी आर्या चुकीच्या मार्गावर गेली होती, तिला व्यसनांची सवय लागली होती आणि तिच्या वागण्याला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे सांगितल्याचा दावा समोर आला आहे. दुसरीकडे, उपलब्ध वृत्तांनुसार आर्याच्या वर्तणुकीमुळे कुटुंबात वारंवार वाद होत असल्याचे पोलिस तपासात समोर आले असून, पालकांनी तिचे समुपदेशन आणि उपचारही सुरू केले होते. मात्र, या पार्श्वभूमीवर स्थानिकांकडून वेगळी माहिती सांगितली जात आहे.
हेही वाचा: Accident News: भरधाव कारला डंपरची भीषण धडक; मध्यरात्रीच्या अपघातात चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
स्थानिक आणि शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आर्या मनमिळावू स्वभावाची होती. ती परिसरातील नागरिकांशी गोड बोलत असे आणि सर्वांमध्ये मिसळून राहत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वडिलांनी सांगितलेल्या कारणांबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, शेजाऱ्यांचे हे दावे आणि कुटुंबीयांकडून सांगितलेली आर्याच्या वर्तणुकीची माहिती यांपैकी कोणती बाब वस्तुस्थितीच्या अधिक जवळ आहे, हे तपासातूनच स्पष्ट होणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार, शनिवारी रात्री घरात टीव्ही पाहण्यावरून आर्याचा लहान भावंडांशी वाद झाला. या वादात तिने लहान बहिणीला मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आर्या वडिलांवर बॅट घेऊन धावून गेल्याचा दावा आहे. यावेळी पुरुषोत्तम यांनी तिच्या हातातील बॅट हिसकावून तिच्या डोक्यात प्रहार केल्याने तिचा मृत्यू झाला.
मुलीच्या मृत्यूनंतर घटनाक्रम लपवण्याचा प्रयत्न झाल्याचाही तपास पोलिसांकडून करण्यात आला. सुरुवातीला आर्या स्वतः जखमी झाल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र, घटनास्थळाची पाहणी आणि फॉरेन्सिक तपासातून पोलिसांचा संशय वाढला. त्यानंतर चौकशीत वडिलांविरुद्ध गंभीर बाबी समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आर्या नेमक्या कोणत्या परिस्थितीत होती, तिच्या वर्तणुकीबाबत कुटुंबीयांनी केलेले दावे कितपत खरे आहेत आणि घटनेच्या रात्री नेमका घटनाक्रम काय घडला, याचा तपास पोलीस करीत आहेत. एका बाजूला वडिलांचा दावा, तर दुसरीकडे शेजाऱ्यांकडून मिळणारी वेगळी माहिती यामुळे या प्रकरणातील अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. त्यामुळे पोलिस तपासातून या हत्याकांडामागील संपूर्ण सत्य काय होते, हे समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.