सातारा पोलिसांची मोठी कारवाई; भिसे टोळीच्या दोघांना शहरातून केले तडीपार
सातारा : राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता साताऱ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सातारा शहरांमध्ये सातत्याने वेगवेगळे गुन्हे करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना सातारा शहरातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. अविनाश राजाराम भिसे (वय २५, रा. प्रतापसिंहनगर), रोहित जितेंद्र भोसले (वय २२, रा. प्रतापसिंहनगर) अशी दोघांची नावे आहेत. हद्दपार प्राधिकरणाचे प्रमुख पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांनी हे आदेश दिले.
भिसे हा टोळी प्रमुख असून, त्याचा सहकारी रोहित भोसले यांनी सातत्याने सातारा शहरांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला होता. घरफोडी, चोरी करणे असे विविध गुन्हे त्यांच्यावर दाखल होते. सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी या टोळीविरुद्ध सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरणाला सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी सातारा राजीव नवले यांनी केली.
या टोळीतील सदस्यांवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करीत सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्यात कोणताही फरक पडला नाही. त्यामुळे या टोळीला सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले. अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी सरकारी पक्षाच्या वतीने काम पाहिले. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, अनुराधा सणस, सातारा शहर पोलीस ठाण्याचे हवालदार दीपक इंगवले, संदीप पवार, अमोल साप्ते यांनी योग्य तो पुरावा सादर केला आहे.
हे सुद्धा वाचा : कमी दारु दिल्याचा राग; कामगाराने डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारुन केला खून