'त्या' महिलेला मिळणार न्याय! शास्त्रीनगर रुग्णायल प्रकरणातील आंदोलन मागे, दोषींना शिक्षा होणार, इंदूराणी जाखड यांचं आश्वासन
डोंबिवली : शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसुतिनंतर महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नाहक जीव गमवावा लागला असल्याचा आरोप पिडीत कुटुंबियांनी केला होता. या प्रकरणी शास्त्रीनगर रुग्णालयात पिडीतेच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं. याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे. शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसुती दरम्यान महिला मृत्यू प्रकरणात केडीएमसी आयुक्त इंदूराणी जाखड यांनी आश्वासनाचे पत्र जारी केलं आहे. हे प्रकरण दिवसेंदिवस तीव्र स्वरुप धारण करत असताना आता राजकीय मंडळींनी देखील या प्रकरणात लक्ष केंद्रित केलं आहे. सदर प्रकरणात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, मनसे शहराध्यक्ष राहूल कामत आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकी दरम्यान केडीएमसी आरोग्य विभागाचे अधिकारी , पोलिस अधिकारी आणि महिलेच्या नातेवाईकांचा सहभाग होता.
या प्रकरणात दिपेश म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, हलगर्जी करणाऱ्या सर्व डॉक्टरांच्या विरोधात कारवाई होणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्ष खाली तीन सदस्यीय चाैकशी समिती स्थापन करणार आहेत. चौकशीच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल. असं दिपेश म्हात्रे यांनी सांगितलं आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, मनसे शहराध्यक्ष राहूल कामत आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणात ज्यांनी रुग्णाच्या आरोग्याचा निष्काळजीपणा केला आहे. अशा हलगर्जी करणाऱ्या सर्व डॉक्टरांच्या विरोधात कारवाई होणार असल्याचं केडीएमसी आयुक्त इंदूराणी जाखड यांच्या आश्वासनाचे पत्र जारी केलं आहे. दरम्यान या सगळ्यात प्रकरणात रुग्णालयात डॉक्टरांच्या विरोधात आंदोलन पिडीत कुटुंबियांनी मागे घेतले आहे.
प्रसुतिनंतर परवानगी न घेता डॉक्टरांनी सुवर्णा सरोदे हिची गर्भपिशवी का काढली? असा सवाल पती अविनाश सरोदे यांनी उपस्थित केला आहे. सरोदे पुढे असंही म्हणाले की, गर्भ पिशवी काढल्यामुळेच तिचा जीव गेला आहे. नातेवाईकांना विश्वासात न घेता डॉक्टारांनी परस्पर तिच्यावर शस्त्रक्रिया केली म्हणून तिचा जीव गेला अशी बाजू पती अविनाश सरोदे यांनी मांडली आहे.
महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात हा प्रकार घडला असून नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा जीव गेल्याचा आरोप केला आहे. डोंबिवलीतील मोठा गाव परिसरात राहणाऱ्या अविनाश सरोदे यांनी पत्नी सुवर्णा सरोदे हिला बुधवारी प्रसुतीसाठी डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केले .सुवर्णा हिने मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. याबाबत सुवर्णा हिचे पती अविनाश सरोदे यांच्या आरोप आहे की, ज्या डॉक्टरने सुवर्णाचे ऑपरेशन केले, ऑपरेशन करण्याआधी आमच्याकडून कोणत्याही प्रकाराची परवानगी घेतली नाही. परवानगीशिवाय डॉक्टरांनी ऑपरेशन केले कसे ? डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाला आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही. डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही हॉस्पिटलमधून जाणार नाही आणि तसेच पुढील प्रक्रिया करणार नाही. अशी भूमिका कुटुंबियाने घेतली होती.