नराधम दत्ता गाडेला 12 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या अत्याचारानंतर संबंधित आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला होता. अखेर पुणे पोलिसांनी या नराधमला बेड्या ठोकल्या आहेत. स्वारगेट बसस्थानकातील अत्याचारप्रकरणात अटक करण्यात आलेल्या नराधमाला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत (12 दिवसांची) पोलीस कोठडी सुनावली आहे. मोबाईल, कपडे व या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, या तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.
दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७) याला मध्यरात्री दीडच्या सुमारास पुणे पोलिसांनी गुनाट या त्याच्या गावावरून पकडले. त्याला अटक केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयात कडेकोट सुरक्षेत हजर करण्यात आले. आरोपी दत्तात्रयने पिडीत तरुणीला ताई म्हणून बोलण्यास सुरूवात केली. कंडक्टर म्हणून तो पिडीत मुलीला बोलला व तिचा विश्वास संपादन केला. त्याने बस दाखवली व अनेक लोक बसमध्ये असल्याचे त्याने दाखविले. पण, बस पुर्ण रिकामी होती. पिडीत तरूणीने बाहेर येण्याचा प्रयत्न केला. तिने विनंती देखील केली. पण, आरोपीने मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर दोन वेळा अत्याचार केला, असे तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले.
तो सराईत गुन्हेगार असून, मोबाईल बंद करून फिरत होता. आरोपीवर दाखल असलेल्या ६ गुन्ह्यापैकी ५ गुन्ह्यात तक्रारदार महिला आहेत त्यामुळे त्याचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ते स्पष्ट होत आहे. या गुन्ह्यामुळे समाजात तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपचा आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करायची आहे. तसेच, त्याचा मोबाईल व कपडे जप्त करायचे आहेत, त्याचे इतर कुणी साथीदार आहेत का याचा तपास करायचा आहे. त्याने फरार काळात कुणाकडे आसरा घेतला याचा तपास करायचा आहे. त्याने असे काही गुन्हे केले आहेत का, हे देखील तपासायचे असल्याने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर त्याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
आरोपी गाडेचे वकील काय म्हणाले?
सहमतीने शारिरीक संबंध झाले आहेत. गाडेने जबरदस्ती केलेली नाही. त्याचा चेहरा टीव्हीवर दाखवला गेला. पोलिसांनी ही घटना सोशल मीडिया ट्रायल केली. एवढा गंभीर गुन्हा नाही. मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली. कुठलाही अत्याचार झाला नाही. त्यामुळे कमीतकमी पोलीस कोठडी देण्याची मागणी वकीलांनी केली.