
इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; कारण अद्याप गुलदस्त्यात
नागपूर : इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून उडी घेत एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. निनाद यतिंद्र विश्वकर्मा (वय १४) याने आत्महत्या केली. ही घटना बेलतरोडी पोलिस ठाण्यांतर्गत पृथ्वीराजनगर येथील मॅक्स ग्लोरी अपार्टमेंटमध्ये घडली. त्याच्या मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, निनाद हा मॅक्स ग्लोरी अपार्टमेंटच्या ‘ए’ विंगमध्ये राहत होता. तो मिहान येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये नववीत शिकत होता. त्याचे वडील यतिंद्र हे सॉफ्टवेअर अभियंता आहे. खासगी संस्थेत कार्यरत आहे. निनाद हा एकुलता एक मुलगा होता. बुधवारी दुपारी शाळेची बस नेहमीपेक्षा सुमारे दहा मिनिटे उशिरा आली. त्यामुळे निनादचे आई-वडील त्याची वाट पाहत होते. दुपारी ३.३० वाजता यतिंद्र यांनी घराच्या गॅलरीतून खाली पाहिले असता निनाद ऑटोचालकाशी बोलताना दिसला. त्यानंतर ते खाली गेले आणि उशीर होण्याचे कारण विचारले. निनादकडे शाळेचे दप्तर नव्हते.
दरम्यान, दप्तराबाबत विचारणा केल्यावर मित्राने नेल्याचे त्याने सांगितले. दप्तर घेऊन घरी येतो, असे सांगून तो इमारतीत गेला. काही वेळाने इमारतीच्या खाली आवाज झाल्याने यतिंद्र यांनी खाली धाव घेतली. तेथे निनाद गंभीर अवस्थेत आढळला. त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मुलाच्या मृत्यूने आई-वडिलांना धक्का
प्राथमिक तपासात संशयास्पद बाब आढळलेली नाही. मात्र, निनादने असे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मुलाच्या मृत्यूमुळे आई-वडिलांना मोठा धक्का बसल्याने सविस्तर माहिती घेणे शक्य झाले नाही. पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
– रवींद्र नाईकवाड, पोलिस निरीक्षक, बेलतरोडी
बाळाच्या कथित विक्रीचा पर्दाफाश
मुकुंदवाडी परिसरात अवघ्या महिन्याभराच्या बाळाच्या कथित बेकायदेशीर खरेदी-विक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे. बाळाच्या जन्मदात्या आई-वडिलांना पैसे देऊन त्यांच्याकडून बाळ घेतल्याचा आरोप दोन महिलांवर करण्यात आला आहे. आईने बाळ परत मागितल्यानंतरही ते न मिळाल्याने तिने पोलिसांकडे धाव घेतली आणि तपासातून कथित व्यवहाराची माहिती समोर आली.