
आधी दुचाकीवर लिफ्ट दिली, नंतर जंगलात दाखवली लुटारूंची भीती; वृद्ध महिलेचे दागिने घेऊन आरोपी फरार
रेशन घेऊन परतताना दुचाकीस्वाराची ओळख
अंजना गोविंदा बोबाटे (वय ७०, रा. एकारा बुंज, ता. ब्रह्मपुरी) या दिवाळीनिमित्त नागभीड तालुक्यातील बाम्हणी येथे आपल्या नातवाकडे आल्या होत्या. दरम्यान, रविवारी एकारा बुंज येथील अमोल डोंगरवार यांनी त्यांच्या नातवाच्या मोबाईलवर संपर्क साधून रेशन आल्याची माहिती दिली होती. त्यानुसार, अंजना बोबाटे सोमवारी सकाळी रेशन घेण्यासाठी एकारा बुंज येथे गेल्या. रेशन घेतल्यानंतर दुपारी सुमारे ११ वाजता त्या नागभीडकडे जाण्यासाठी बसथांब्यावर उभ्या होत्या. याचवेळी एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने त्यांच्याजवळ येऊन आपणही नागभीडला जात असल्याचे सांगितले. त्याने लिफ्ट देण्याची तयारी दर्शविल्याने महिला त्याच्या दुचाकीवर बसल्या.
जंगलात लुटारूंची भीती दाखवून दागिने घेतले
प्रवासादरम्यान दुचाकीस्वाराने मेंडकी-बाळापूर मार्गे राजोली-बोंड मार्गाने प्रवास सुरू केला. पुढे गोवारपेठ गावाजवळील जंगलातील कच्च्या रस्त्यावर त्याने अचानक मोटारसायकल थांबवली. या परिसरात लुटारू फिरत असल्याची भीती त्याने वृद्ध महिलेला दाखवली. तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने सुरक्षित राहणार नाहीत, असे सांगत ते गव्हाच्या चुंगडीत ठेवण्याचा सल्ला दिला. आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिलेने दागिने काढण्यास सुरुवात केली.
हातचलाखीने पिशवी घेतली अन् पसार
महिला दागिने ठेवत असताना आरोपीने हातचलाखीने त्यांची पिशवी स्वतःकडे घेतली. दागिने गव्हाच्या चुंगडीत व्यवस्थित ठेवून देतो, असे सांगून त्याने महिलेला विश्वासात घेतले. त्यानंतर शौचाला जाण्याचा बहाणा करून तो मोटारसायकलसह तेथून निघून गेला. बराच वेळ उलटूनही दुचाकीस्वार परत न आल्याने अंजना बोबाटे यांना संशय आला. त्यांनी पिशवी आणि गव्हाची चुंगडी तपासली असता त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांना धक्का बसला.
नागभीड पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकारात वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. या घटनेनंतर नागभीड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहेत. नागरिकांनी प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, तसेच सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहावे, असे आवाहन या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.
Ans: चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात गोवारपेठ गावाजवळील जंगलातील कच्च्या रस्त्यावर सोमवारी ही घटना घडली.
Ans: आरोपीने नागभीडला जाण्याच्या बहाण्याने महिलेला दुचाकीवर लिफ्ट दिली. जंगलात लुटारूंची भीती दाखवून दागिने गव्हाच्या चुंगडीत ठेवण्यास सांगितले आणि हातचलाखीने ऐवज घेऊन पसार झाला.
Ans: वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी नागभीड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.