
नांदुरामध्ये दरोडेखोरांचा थरार! इंडस टॉवरवर चोरी करताना अलार्म वाजला; सुरक्षा रक्षकांनी तिघांना पकडले
टॉवरमधील २४ बॅटरी काढल्या
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील वडी फाट्याजवळ इंडस कंपनीचा मोबाईल टॉवर आहे. रविवारी पहाटे पाच जणांच्या टोळीने या टॉवरला लक्ष्य केले. आरोपींनी रिंगपाना, पक्कड आणि लहान-मोठ्या कटरच्या साह्याने टॉवरमधील साहित्याची तोडफोड केली. यावेळी त्यांनी एचबीएल ६०० पॉवरच्या तब्बल २४ बॅटरी काढून घेतल्या. मात्र, बॅटरी काढण्याच्या प्रयत्नादरम्यान टॉवरचा अलार्म वाजला. त्याचा संदेश थेट पुणे येथील कंपनीच्या कार्यालयात पोहोचला. त्यामुळे चोरीची माहिती तातडीने सुरक्षा यंत्रणेला मिळाली.
अलार्मचा संदेश मिळताच सुरक्षा रक्षकांची धाव
अलार्मचा संदेश मिळाल्यानंतर कंपनीच्या कार्यालयातील तंत्रज्ञांनी सुरक्षा रक्षक मधुकर मोतीराम लहासे यांना माहिती दिली. तसेच ११२ क्रमांकावर संपर्क साधून नांदुरा पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान, सुरक्षा रक्षक किशोर चोपडे आणि श्रीकृष्ण ढगे यांनी तातडीने टॉवर परिसरात धाव घेतली. यावेळी दरोडेखोर आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झटापट झाली. दोन आरोपींनी सुरक्षा रक्षक किशोर चोपडे यांना मारहाण करून घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, उर्वरित तीन आरोपींना दुसऱ्या सुरक्षा रक्षकाने धाडसाने पकडून ठेवले.
पोलिसांनी तिघांना केली अटक
घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षा रक्षकांनी पकडून ठेवलेल्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान आरोपींकडून एमएच २६ / व्ही-०३१४ क्रमांकाचे वाहन आणि २४ बॅटरी जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच टॉवरची तोडफोड करून आरोपींनी सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान केले आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
या घटनेची माहिती मिळताच मलकापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहम माछरे आणि पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमराज कोळी करीत आहेत. पसार झालेल्या उर्वरित दोन आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
हे सुद्धा वाचा : एसटी बसचा भीषण अपघात, ब्रेक निकामी झाल्याने बस खड्ड्यात उलटली; जखमींचा आकडाही समोर
सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठी चोरी टळली
मोबाईल टॉवरमधील महागड्या बॅटरी चोरी करण्याचा पाच जणांच्या टोळीचा प्रयत्न अलार्म आणि सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. पहाटेच्या वेळी जीवाची पर्वा न करता सुरक्षा रक्षकांनी दाखविलेल्या धाडसामुळे तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले. या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे.
Ans: नांदुरा तालुक्यातील वडी फाट्याजवळ असलेल्या इंडस कंपनीच्या मोबाईल टॉवरवर रविवारी पहाटे सुमारे २.३० वाजता दरोड्याचा प्रयत्न झाला.
Ans: या दरोड्यात पाच आरोपी सहभागी होते. सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे तिघांना पकडण्यात आले, तर दोघे घटनास्थळावरून पसार झाले.
Ans: आरोपींनी टॉवरमधील एचबीएल ६०० पॉवरच्या २४ बॅटरी काढल्या. या घटनेत टॉवरची तोडफोड करून सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान करण्यात आले.