Worker dies after falling from roof
पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा वसतिगृहात मृतावस्थेत मृतदेह आढळून आला आहे. शुक्रवारी हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्याने आत्महत्या केली असावी अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्या मृतदेहाशेजारी गोळ्यांचे पाकिटे मिळाले असून, मृतदेहाचे शवविच्छेदन झाले आहे.
भूषण ढुमणे (वय १९, मूळ रा. वर्धा) असे मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. भूषण फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. शुक्रवारी सकाळी महाविद्यालयाच्या आवारातील वसतिगृहात भूषण बेशुद्धावस्थेत पडल्याचे लक्षात आले. वसतिगृहातील विद्यार्थ्यांने याबाबतची महिती महाविद्यालयीन प्रशासनाला दिली. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. वसतिगृहातील खोलीत औषधाच्या गोळ्यांचे पाकिट सापडले आहे. तेथे वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याची चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. पोलिसांकडून भूषणच्या मित्रांकडे विचारपूस करण्यात आली. लवकरच परीक्षा सुरू होणार होती, अशी माहिती मित्रांनी दिली. दरम्यान डॉक्टरांनी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असून, व्हिसेरा राखून ठेवला आहे. त्याने गोळ्या खाऊन आत्महत्या केली असावी अशी शक्यता आहे.