Surat Mother Son Death News: जन्मदात्या आईने तिच्या ४ वर्षांच्या निष्पाप मुलाला १३ व्या मजल्यावरून खाली फेकून दिले आणि त्यानंतर लगेचच स्वतःही उडी मारून जीवन संपवले. ही घटना गुजरात येथील सुरत येथे घडली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृत महिलेची ओळख ३० वर्षीय पूजा पटेल आणि तिच्या मुलाचे नाव कृषिव पटेल असे आहे. ही घटना सुरतमधील अल्थान एक्सटेंशन येथील मार्तंड हिल्स अपार्टमेंटमध्ये घडली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असता, सीसीटीव्ही फुटेजमधून एक धक्कादायक सत्य समोर आले. फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, पूजा तिच्या मुलासह ‘सी टॉवर’च्या १३ व्या मजल्यावर गेली. विशेष म्हणजे, त्यांचे घर याच अपार्टमेंटच्या ‘ए टॉवर’मध्ये ६ व्या मजल्यावर होते.
१३ व्या मजल्यावर पोहोचल्यानंतर पूजाने आधी तिच्या निष्पाप मुलाला खाली फेकले आणि नंतर स्वतःही उडी मारली. दोघांचे मृतदेह अपार्टमेंटजवळच्या गणेश मंडाळाजवळ पडले होते. त्यावेळी सोसायटीमधील अनेक रहिवासी गणेशपूजेत व्यस्त होते. मृतदेह पाहताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच पूजाचा पती विलेश पटेल घटनास्थळी पोहोचला. तो त्यावेळी घरी नव्हता. पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेचे खरे कारण जाणून घेण्यासाठी पोलीस सध्या पती, शेजारी आणि पूजाच्या आई-वडिलांचे जबाब नोंदवत आहेत.
ही माहिती मिळताच, आजूबाजूचे लोक घटनास्थळी धावले. काही वेळातच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि पूजा आणि कृषिव यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दरम्यान, रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु १३ व्या मजल्यावरून पडल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक राहिली. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली, परंतु दुर्दैवाने दोघांनाही मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
पोलिसांना पूजाच्या कपड्यांमध्ये रक्ताने माखलेली एक सुसाईड नोट सापडली आहे. पोलिसांनी सुसाईड नोट आणि पूजाचा मोबाईल जप्त करून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. सुरतमधील या हृदयद्रावक घटनेने सर्वांना हादरवून टाकले आहे. एका जन्मदात्या आईने आपल्याच मुलाला संपवून स्वतः आत्महत्या का केली, याचे नेमके कारण पोलिसांच्या सखोल तपासानंतरच समोर येईल.