तनिष्कच्या शोरूममध्ये दिवसाढवळ्या दरोडा, २० मिनिटांत २५ कोटी रुपयांच्या दागिन्यांची लूट (फोटो सौजन्य-X)
Tanishq Showroom Robbery In Marathi: बिहारमधील आरा येथे पुन्हा एकदा निर्भय दरोडेखोरांनी तनिष्क शोरूमला लक्ष्य केले आहे. भोजपूर जिल्ह्यातील आरा बाजारातील गोपाली चौक येथील तनिष्क शोरूममध्ये गुन्हेगारांनी घुसून शोरूममधील कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले आणि अवघ्या २० मिनिटांत २५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे दागिने लुटले. गुन्हेगार इतके निर्भय होते की घटनेदरम्यान कोणीही आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्यांना कोणाची भीती वाटली नाही.
या घटनेनंतर चोर अगदी आरामात बाहेर आला आणि त्याच्या दुचाकीवरून पळून गेला. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, दरोडेखोरांची संख्या ६ ते ७ असू शकते. पोलिसांनी शोरूममधील सीसीटीव्ही जप्त केले असून यामध्ये, गुन्हेगारांना शोरूममध्ये २० मिनिटे दिसतात आणि त्या काळात ते २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने पळून घेऊन जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकाबंदी केली आहे. सीसीटीव्ही पाहिल्यानंतर पोलिसांच्या दोन पथकांनी डायरा परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी तनिष्क शोरूम उघडताच दोन दरोडेखोर ग्राहक असल्याचे भासवून आत घुसले. या गुन्हेगारांनी आत प्रवेश करताच त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाला ओलीस ठेवले. दरम्यान, आणखी तीन गुन्हेगार आत शिरले. या दरोडेखोरांनी शोरूममध्ये उपस्थित असलेल्या सेल्समन आणि इतर कर्मचाऱ्यांना बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवले आणि त्यांना एका ठिकाणी उभे केले. यानंतर, उर्वरित गुन्हेगारांनी शोरूममध्ये असलेले दागिने गोळा करण्यास सुरुवात केली. यावेळी, मौल्यवान दागिन्यांचा पत्ता न सांगितल्याबद्दल एका सेल्समनवरही हल्लेखोरांनी बंदुकीच्या धाकाने हल्ला केला.
या घटनेनंतर गुन्हेगार आरामात बाहेर पडले आणि त्यांच्या दुचाकीवरून वेगवेगळ्या दिशेने पळून गेले. दरम्यान पोलिस सूत्रांनी दावा केला की नंतर दोन्ही गुन्हेगार छपराकडे पळून गेले. तनिष्क स्टोअरचे व्यवस्थापक कुमार मृत्युंजय म्हणाले की, सुमारे ५० कोटी रुपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने होते. ज्यामध्ये आठ सशस्त्र गुन्हेगारांनी २५ कोटींहून अधिक किमतीचे हिरे आणि मौल्यवान सोन्याचे दागिने इत्यादी लुटले. त्यांनी सांगितले की, दुकानात पुरुष आणि महिलांसह २५ हून अधिक कर्मचारी उपस्थित असताना गुन्हेगारांनी हा गुन्हा केला.
गुन्हेगारांच्या शोधात परिसरात शोधमोहीम राबवणाऱ्या पोलिसांनी बधरा पोलीस स्टेशन परिसरातील बाबुरा परिसरात झालेल्या चकमकीत दोन गुन्हेगारांना पकडले आहे. पोलिसांनी या दोन्ही गुन्हेगारांच्या पायात गोळ्या झाडल्या आहेत. या चकमकीदरम्यान गुन्हेगारांनी पोलिसांवरही गोळीबार केला. सुदैवाने गोळी कोणत्याही पोलिसाला लागली नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दरोडेखोरांकडून चोरीचा बराचसा माल जप्त करण्यात आला आहे. अद्याप पोलिसांनी या संदर्भात कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही. सध्या जखमी गुन्हेगारांची ओळख पटली आहे. कुणाल हा सारण (चपरा) येथील सोनपूर पोलीस स्टेशन परिसरातील सेमरा गावचा रहिवासी आहे आणि विशाल कुमार दिघवारा येथील आहे. पोलीस आता उर्वरित गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.