तासगाव पोलिसांनी सराईत चोरट्याला पकडले; तब्बल 'इतक्या' लाखांचा मुद्देमाल जप्त
तासगाव : तासगाव, कराड, विटा, खालापूर व शिरोली हद्दीतील जबरी चोरी व चैन स्नॅचिंग प्रकरणातील सराईत गुन्हेगारास पकडण्यात तासगाव पोलिसांना यश आले आहे. शीतल मारुती मिरजे (वय ३२, रा. शिंदेवाडी, ता. कवठेमहांकाळ) असे संशयितांचे नाव आहे. त्याच्याकडून २५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली. यावेळी उपअधीक्षक सचिन थोरबोले, निरीक्षक सोमनाथ वाघ व गुन्हे प्रकटीकरणचे पथक उपस्थित होते.
घुगे म्हणाले की, तासगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरी करण्याचे प्रकार घडले होते. त्या अनुषंगाने तपास सुरू होता. यादरम्यान हवालदार अमर सूर्यवंशी यांना विटा नाका, चिंचणी नाका, शिवाजी चौक परिसरात गस्तीवर असताना संशयित चोरटा दुचाकीवरून येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सूर्यवंशी व पथक घटनास्थळी गेले. यावेळी संशयित मिरजे हा संशयितरित्या दिसून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ अर्धवट तुटलेले सोन्याचे दागिने मिळून आले. या दागिन्याविषयी तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. अधिक चौकशी केली असता त्याने दागिने चोरीची कबुली दिली.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान त्याने नऊ गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून २८० ग्रॅम वजनाचे २३ लाख ५९२ किमतीचे सोन्याचे दागिने, दोन दुचाकी, असा २५ लाख ५९२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पथकात सुहास खुबीकर, प्रशांत चव्हाण, विठ्ठल सानप, विवेक यादव, योगेश जाधव, पवन जाधव, आरती खोत यांचा समावेश होता. उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे अधिक तपास करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : जत पोलिसांची मोठी कारवाई; वयोवृद्ध महिलेला लुटणाऱ्याला ठोकल्या बेड्या
कारची काच फोडून चोरी
राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातील विमाननगर परिसरात रस्त्याच्या कडेला लावलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी तब्बल दहा लाख ५१ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यावसायिकाने याबाबत तक्रार दिली असून, या चोरट्यांनी पाळत ठेवून चोरी केल्याचा संशय आहे. याप्रकरणी नितेशकुमार राजकुमार शहा (वय ३४, रा. चारकोप, कांदिवली, मुंबई) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शहा व्यावसायिक आहेत. ते कामानिमित्त मुंबईहून विमाननगर येथे आले होते. तेव्हा विमाननगर भागातील वाटिका सोसायटीसमोर त्यांनी रविवारी रात्री कार लावली. नंतर ते कामाच्या ठिकाणी गेले. त्यावेळी चोरट्यांनी कारची काच फोडली. कारमधील पिशवीत ठेवलेली साडेदहा लाखांची रोकड चोरुन पोबारा केला. घटना लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.