संग्रहित फोटो
मालेगाव : जुन्या वादाची कुरापत काढून एका तरुणाची चाकूने भोसकून निघृण हत्या करणाऱ्या आरोपीला अप्पर सत्र न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. वाय. गौड यांनी हा निकाल दिला आहे. शेख रहीम शेख रज्जाक उर्फ रहीम भजिया (वय ३५) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला जन्मठेपेसह दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तर या खटल्यातील दुसरा आरोपी शेख सलीम शेख याकुब उर्फ सलीम चमडा याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
ही घटना २१ एप्रिल २०२१ रोजी कमालपुरा भागातील भिकू चौकाजवळ घडली होती. फिर्यादी इम्तियाज खान अमन उल्ला खान यांचा भाऊ फैसल खान याच्याशी आरोपी रहीम भजिया याने जुन्या वादावरून हुज्जत घातली. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी रहीम भजिया, त्याचा भाऊ मजीद भजिया आणि मित्र सलीम चमडा यांनी फैसल खान याला गाठले. आरोपींनी फैसलवर धारदार चाकूने पोटावर गंभीर वार केले. या प्राणघातक हल्ल्यात फैसलच्या आतड्या बाहेर येऊन तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. फिर्यादी आणि प्रत्यक्षदर्शीनी मदतीसाठी धाव घेतली असता आरोपी त्यांच्यावरही धावून गेले. उपस्थितांनी रहीम भजिया याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी तेथून पसार झाले. गंभीर जखमी फैसलला तातडीने नूर हॉस्पिटल आणि त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सुनावणीदरम्यान संशयिताचा मृत्यू
याप्रकरणी मयताच्या भावाच्या फिर्यादीवरुन मालेगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपी मजीद भजिया याचा मृत्यू झाला.
यांनी पाहिले खटल्याचे काम
सदर खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. वाय. गौड यांच्या न्यायालयात पार पडली. सरकारी पक्षातर्फे ज्येष्ठ अतिरिक्त सरकारी वकील अॅड. संजय कौतिकराव सोनवणे यांनी एकूण १० महत्त्वाचे साक्षीदार तपासले. त्यांनी मांडलेला सबळ युक्तीवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी रहीम भजिया याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस हवालदार मुकुंद परदेशी यांनी विशेष परिश्रम घेतले.






