
“हनुमान चालीसा म्हण नाहीतर…” मंदिर सचिवाला गोळी मारण्याची धमकी, नवी मुंबईत खळबळजनक प्रकार
सावन वैश्य | नवी मुंबई : सीवूड्स सेक्टर ४८ येथील मारुती मंदिर परिसरात एका युवकाने पुजाऱ्याला धमकावत मारहाण केल्याची तसेच मंदिर प्रशासनाच्या सचिवाला गोळी मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली असून, यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जस्वीर तांडेल (वय ३५) याच्याविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साईबाबा मंदिरात पूजा-अर्चा करणारे पुजारी आकाश माधवप्रकाश गोस्वामी (वय ३०) हे दर शनिवारी सीवूड्स सेक्टर ४८ येथील मारुती मंदिरात विड्याच्या पाण्याचा नैवेद्य अर्पण करतात. शनिवारी नैवेद्यासाठी पान आणण्याकरिता ते नवरत्न हॉटेलजवळील पान टपरीवर गेले असता, तेथे आरोपी जस्वीर तांडेल आला.
यावेळी तांडेल याने पुजाऱ्याला “हनुमान चालीसा म्हण, नाहीतर सिगरेट घेऊन दे” अशी मागणी दिली. पुजाऱ्याने नकार दिल्यानंतर आरोपीने शिवीगाळ करत त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
इतक्यावरच न थांबता, आरोपीने साईबाबा मंदिर कमिटीचे सचिव संचू (संजू) मेनन यांना गोळी मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. संजू मेनन हे सामाजिक कार्यकर्ते असून, नवी मुंबई परिसरात चरस, गांजा व अमली पदार्थांविरोधात सातत्याने आवाज उठवत असल्यामुळेच त्यांना लक्ष्य करण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
दरम्यान, या घटनेनंतरही आरोपीची दहशत कायम असल्याचे दिसून आले. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास, जस्वीर तांडेल याने सीवूड्स सेक्टर ४४ येथील पतंजली दुकानाबाहेर ब्रिजेश पाटील या फरियादीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने थेट मटण दुकानातून मोठी सुरी उचलून धाव घेतल्याने एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी ब्रिजेश पाटील हे पतंजली दुकानात शिरले व तात्काळ ११२ क्रमांकावर कॉल केला. सुमारे पंधरा मिनिटांनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
या संपूर्ण प्रकरणामुळे मंदिर परिसरातील भाविक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धार्मिक स्थळी आणि सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
एनआरआय पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, आरोपी जस्वीर तांडेल याचा गुन्हेगारी इतिहासही तपासण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. आता पोलीस प्रशासन या प्रकरणात नेमकी कोणती ठोस कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.