लेक ओढ्याच्या पाण्यात पडला, वाचवण्यासाठी आईने उडी मारली अन्...; दौंड तालुक्यातील धक्कादायक घटना
यवत : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राहू नजिक देवकरवाडी येथे वाहत्या पाण्यात पडलेल्या मुलाला वाचवायला जाऊन अईने पाण्यात उडी मारल्यामुळे दोघा माय- लेकराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. निर्मला अनिल दरेकर( वय ३२) आणि मुलगा हर्षद अनिल दरेकर ( वय ११ वर्ष) हे मयत झाले आहेत.
रविवार २७ जुलै रोजी दौंड तालुक्यातील देकरवाडी गणेशनगर येथील शेतात निर्मला ऊस खुरपण्यासाठी गेल्या होत्या. रविवार सुट्टी असल्याने मुलगा हर्षद हा बरोबर आलेला होता. दुपारच्या वेळी तो खेळता- खेळता शेतात कडेच्या ओढ्याच्या पाण्यात पाय घसरुन पडला. हे पाहताच निर्मला यांनी त्यला वाचवण्यासाठी आरडाओरडा करीत पाण्यात उडी घेतली. परतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आई व मुलगा दोघांचाही पाण्यात बुडुन मृत्यू झाला. दरम्यान काही वेळानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मयत झालेल्या माय लेकराला पाण्याबाहेर काढले.
दरम्यान यावेळी हर्षद याचे वडील अनिल सोपान दरेकर हे हर्षद याची सायकल दुरुस्त करण्यासाठी खामगाव येथे गेले होते. यादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. पाण्यातून बाहेर काढण्यात आलेल्या मायलेकराला त्वरीत उपचारासाठी यवत ग्रामीण रूग्णालयात नेले असता उपचारापुर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सांयकाळी आई आणि मुलावर एकत्र अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अनिल दरेकर यांनी यवत पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे देवकरवाडी आणि परिसरात शोककळा पसरली आहे .
मुलगा अन् दोन नातीच्या मृत्यूच्या धक्क्याने आजोबांनीही सोडले प्राण
बारामती शहरामध्ये रविवारी हायवा ट्रकच्या धडकेत मुलासह दोन लहान नातींचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान रात्री या धक्क्याने आजोबाचेही निधन झाल्याची हृदयद्रावक घटना बारामती शहरात घडली आहे. एकाच कुटुंबातील चार जण गेल्याने बारामती परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. दरम्यान या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे. बारामती शहरातील खंडोबा नगर येथील चौकात हायवा ट्रकने दोन लहान मुलींना घेऊन निघालेल्या ओंकार आचार्य (वय ३२) या तरुणाच्या दुचाकीला धडक दिल्याने या भीषण अपघातात पित्यासह दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या धक्कादायक घटनेमुळे बारामती परिसरावर शोककळा पसरली. दरम्यान ओंकार आचार्य यांचे सेवानिवृत्त वडील राजेंद्र आचार्य यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.