कराडमध्ये रिक्षात चक्क घरगुती गॅस भरला; पोलिसांनी दोघांवर केली मोठी कारवाई
कराड : कराड शहरासह मलकापूर परिसरात बेकायदेशीर विनापरवाना घरगुती गॅस रिक्षात भरण्याचे प्रकार दिवसेंदिवस समोर येत आहेत. त्यात अशातच आता सैदापूर कॅनॉल ते मसूर जाणाऱ्या रोडवर सूर्या मस्तानी कॅफेच्या पाठीमागील बाजूला बेकायदेशीर विनापरवाना घरगुती गॅस टाकीतून पाईपच्या सहाय्याने रिक्षात गॅस भरताना पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चौदा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार महेश शिंदे यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वप्निल सुनिल यादव (वय २८, रा. सैदापूर कॅनॉल, ता. कराड) व शिवाजी जाधव अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सैदापूर कॅनॉल ते मसूर जाणाऱ्या रोडवर सूर्या मस्तानी कॅफेच्या पाठीमागील बाजूस स्वप्निल यादव हा दररोज उघड्यावर बेकायदेशीर विनापरवाना सार्वजनिक जिवीतास व मालमत्तेस धोका होईल, अशा स्थितीत घरगुती वापराचे गॅस सिलिंडर रिक्षामध्ये व अन्य वाहनामध्ये भरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश माळी यांनी शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सैदापूर कॅनॉल ते मसूर जाणाऱ्या रोडवर सूर्या मस्तानी कॅफेच्या पाठीमागील बाजूस छापा टाकला असता तेथे स्वप्निल हा अवैधरित्या रिक्षात गॅस भरताना आढळून आला.
हे सुद्धा वाचा : चौकशीबद्दल कोणाशी बोलू नकोस, अन्यथा…; अमेरिकेतील भारतीयाला 45 लाखांना घातला गंडा
१४ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी त्याच्याकडे शासनाकडून परवाना घेतला आहे का?, हे काम कोणासाठी करत असल्याचे विचारले असता त्याने शिवाजी जाधव यांच्यासाठी त्यांच्या सांगण्यावरून काम करत असल्याचे सांगितले. पोलिसांनी स्वप्निल याच्याकडून चार हजार रूपये किमतीचा इलेक्ट्रिक गॅस क्रॉम्प्रेसर, पाच हजार रूपये किमतीच्या घरगुती गॅस सिलिंडर टाक्या, ६०० रूपये किमतीचे दोन नोझल, चार हजार रूपये किमतीचा वजनकाटा असा एकूण १४ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हे सुद्धा वाचा : पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या; पुण्यातील कात्रज भागात सापळा रचून पकडले