सातव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजुराचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे : कोंढवा भागात सुरू असलेल्या बहुमजली बांधकाम इमारतीच्या सातव्या मजल्यावरून लिफ्टच्या डक्टमधून खाली पडून एका मजूराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्हा नोंदवला आहे. सनी डाक्टर सोनी (वय १९, रा. टिळेकरनगर) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात डाक्टर सोनी यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवलेवाडीत पिरॅमिड कन्स्ट्रक्शन साईटवर बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी तक्रारदार सोनी यांचे कुटुंबीय कामाला असून लेबर कॉलनीत राहायला आहेत. ४ नोव्हेंबरला संध्याकाळी सातच्या सुमारास सनी हा इमारतीच्या सातव्या मजल्यावर गेला होता. त्यावेळी लिफ्टसाठी ठेवलेल्या मोकळ्या जागेत पडून तो गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान १९ डिसेंबरला त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, कामगारांच्या सुरक्षिततेबाबत हयगय केल्याप्रकरणी संबंधिताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव अधिक तपास करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : सदाभाऊ खोत अन् पडळकरांनी फडणविसांची घेतली भेट, नेमकं काय चर्चा झाली?
चोरटा पहिल्या मजल्यावरुन पडला
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली बालेवाडी भागातील सोसायटीत घरफोडी करण्यासाठी आलेला चोरटा पहिल्या मजल्यावरुन खाली पडला आणि गंभीर जखमी झाला आहे. तो पंधरा ते वीस फुटावरुन पडला. चोरट्याला रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरट्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बप्पा सरकार (वय ३२, सध्या रा. मुंबई) असे जखमी चोरट्याचे नाव आहे. याबाबत एका रहिवाशाने बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार बालेवाडी भागातील इयाॅन सोसायटीतील पहिल्या मजल्यावर राहायला आहेत. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास सरकार सोसायटीच्या आवारात शिरला. सोसायटीतील पाइपच्या आधारे तो पहिल्या मजल्यावर गॅलरीत उतरला. आवाज झाल्याने तक्रारदार झोपेतून जागे झाले आणि त्यांनी गॅलरीतून डोकावून पाहिले. तेव्हा या चोरट्याने तक्रारदार जागे झाल्याचे पाहून पाइपवरुन उतरून पसार होण्याचा प्रयत्न केला.मात्र तो पंधरा ते वीस फुटावरुन कोसळला. सोसायटीच्या आवारात पडला. तक्रारदाराने सोसायटीतील रहिवाशांना जागे केले. सुरक्षा रक्षकांने त्याला पकडले. चौकशी करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी जखमी अवस्थेतील या आरोपीला रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक चाळले अधिक तपास करत आहेत.