crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अंत्यसंस्कार उरकून पतीनेही त्याच विहिरीपासून अवघ्या पाच फूट अंतरावर जीवन संपवले. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी कर्जबाजारीपणामुळे टोकाचा पाऊल उचलत असल्याचा संदेश व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव विलास रामभाऊ जमधडे (वय ४३, रा. आळंद) असे आहे. ही घटना फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे घडली आहे.
नेमकं काय घडलं?
विहिरीच्या जवळच लिंबाच्या झाडाला गळफास लावून विलास जमधडे हे शुक्रवारी गावी गेले होते. तेव्हा त्यांच्या दिवशी पत्नी रमाबाई यांनी शेतातील विहिरीत उडी घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले त्यानंतर त्यांची मुलं व नातेवाईक घरी गेले. त्यांनतर पती विलास जमधडे यांनी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेतात जाऊन त्यांनी मोबाईलवर व्हॉट्सअॅप ग्रुपवर कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत असल्याची पोस्ट केली आणि पत्नीने आत्महत्या केलेल्या विहिरीजवळील झाडाला गळफास घेतला. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगी व दोन अविवाहित मुले आहेत.
व्हॉट्सअॅप मेसेज काय?
जमधडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्या व्हॉट्सअॅप वरून ग्रुपवर मेसेज केला आहे. मी विलास रामभाऊ जमधडे, माझ्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे पीक कर्ज असल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. माझ्या बायकोने पण काल बँकेचे कर्ज असल्यामुळे आत्महत्या केली आहे. सुमित, अमित मला माफ करा, पण माझी शेवटची इच्छा तुम्ही आळंद येथूनच शिक्षण पूर्ण करा. माझी प्रिय मुले, असं त्यांनी त्यांच्या मेसेजमध्ये लिहलं आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
पोस्ट वाचून ग्रामस्थांनी घेतली धाव
विलास जमधडे यांची पोस्ट वाचताच ग्रामस्थ घटनास्थळी धावले. मात्र शेत गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असल्याने तेथे पोहोचण्यास वेळ लागला. तोपर्यंत जमधडे यांनी गळफास घेतला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थांना त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. यानंतर वडोद बाजार पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून उत्तरीय तपासणीसाठी तो फुलंब्री उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.
ग्रामस्थांनी काय दिली माहिती?
ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विलास जमधडे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या नावावर अवघी ४३ गुंठे जमीन होती. शेतीतून पुरेसा उत्पन्न न मिळाल्याने ते पत्नीसमवेत मजुरी करून उदरनिर्वाह भागवत होते. मात्र त्यांच्यावर बँक, सोसायटी तसेच खासगी सावकारांचे मोठे कर्ज होते. पत्नी रमाबाई यांच्यावरदेखील बचत गटाचे कर्ज असल्याचे समोर आले आहे.