पुण्यात वाहन चोरी करणारा अल्पवयीन ताब्यात; 5 दुचाकी अन् दोन रिक्षा जप्त
पुणे : पुण्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, पुण्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता शहर परिसरात वाहनचोरी करणार्या अल्पवयीनाला वारजे पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ५ दुचाकी आणि २ रिक्षा जप्त करण्यात आल्या असून, वारजे माळवाडी, राजगड, भोसरी, येरवडा पोलीस ठाण्यात सात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. मौजमजेसाठी त्याने वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे. ही कारवाई वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय नरळे, अंमलदार शरद पोळ, योगेश वाघ, सागर कुंभार यांच्यासह पथकाने केली आहे.
पुणे शहरात वाहनचोरीचे गुन्हे वाढले आहेत. मध्यवर्ती भागासह उपनगरांत वाहन चोरीला जाण्याचे प्रमाण मोठे आहे. या पार्श्वभूमीवर वारजे पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. त्यादरम्यान येथील बारटक्के हॉस्पिटलजवळ एकजण दुचाकीवर संशयितरित्या थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. सापळा रचून संबंधीताला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याच्याकडील दुचाकी ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या पालकासमक्ष चौकशी केली असता त्याने शहराच्या विविध भागातून वाहनचोरी केल्याचे सांगितले. त्यानूसार पोलिसांनी त्याच्याकडून ५ दुचाकी, दोन रिक्षा जप्त केल्या.
हे सुद्धा वाचा : घरफोडी करणाऱ्याला जालन्यात जाऊन पकडले; डेक्कन पोलिसांची मोठी कारवाई
कारची काच फोडून चोरी
राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं गेल्या काही दिवसाखाली विमाननगर परिसरात रस्त्याच्या कडेला लावलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी तब्बल दहा लाख ५१ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यावसायिकाने याबाबत तक्रार दिली असून, या चोरट्यांनी पाळत ठेवून चोरी केल्याचा संशय आहे. याप्रकरणी नितेशकुमार राजकुमार शहा (वय ३४, रा. चारकोप, कांदिवली, मुंबई) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शहा व्यावसायिक आहेत. ते कामानिमित्त मुंबईहून विमाननगर येथे आले होते. तेव्हा विमाननगर भागातील वाटिका सोसायटीसमोर त्यांनी रविवारी रात्री कार लावली. नंतर ते कामाच्या ठिकाणी गेले. त्यावेळी चोरट्यांनी कारची काच फोडली. कारमधील पिशवीत ठेवलेली साडेदहा लाखांची रोकड चोरुन पोबारा केला. घटना लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.
हे सुद्धा वाचा : वाढदिवसाची पार्टी करुन परतताना काळाचा घाला! कारची बसला जोरदार धडक