संग्रहित फोटो
पुणे : रस्ताच्या कडेला थांबलेल्या प्रवासी बसला भरधाव वेगात आलेली स्विफ्ट कार धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी पहाटे वडगाव पूल परिसरात हा अपघात घडला आहे. अपघातात कारमधील अन्य तीन ते चारजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांत बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
स्मित समीर पवार (१९, रा. पिंपळे गुरव) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. तर, सोहम आलिष खळे (वय १९, रा.औंध), आयुष अंबिदास काटे (वय २०, रा. दापोडी), अथर्व हंबीरराव झेडगे (वय १९, रा. पिंपळे गुरव), प्रतीक दीपक बंडगर (१९, रा. पिंपळे गुरव), हर्ष नितीन वरे (वय १९, रा. पिंपळे गुरव) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी चंद्रशेखर बाबासाहेब सुरवसे (४३, रा. नर्हे) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस शिपाई दत्तात्रय पंढरीनाथ राख (४०) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनूसार, संबंधीत तरूण हे औध, पिंपळे गुरवचे रहीवासी आहेत. त्यांच्यातील एकाचा वाढदिवस असल्याने ते शहरात आले होते. पहाटे स्विफ्ट कारने ते परत जात असताना वडगाव पूल येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या प्रवासी बसला पाठीमागून त्यांची जोरात धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की यात स्विफ्ट कारच्या पुढील काही भाग चक्काचूर झाला. अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर, अन्यजण जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात हलविले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष्य करून धोकादायक पद्धतीने बस उभी केल्यामुळे बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दीर- भावजयचा मृत्यू
पुण्यातील जेल रोडवरील एका रुग्णालयासमोर गेल्या काही दिवसाखाली भरधाव कारने दिलेल्या धडकेत दीर भावजयीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोहगाव परिसरातील जेल रस्त्यावरील संजय पार्क येथे हा अपघात गुरूवारी सकाळी झाला. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशीर्वाद गोवेकर (वय ५२), रेश्मा गोवेकर (वय ४७) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक अचलकुमार (वय ४३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रसाद गोवेकर (वय ५४, रा. शिव पार्वती मंगल कार्यालयाजवळ, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.