
घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई
पुणे : घराच्या चार भिंतींतच पॅकिंग मशीन लावून सुगंधित तंबाखूचा कारखाना थाटल्याचा प्रकार समोर आला असून, मध्य प्रदेशातून आलेल्या दोघांकडून साध्या तंबाखूमध्ये गुलाबपाणी, मेंथॉल आणि ग्लिसरॉल मिसळून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तयार केली जात होती. तर, अमूलच्या नावाचा वापर करून बनावट चिजही बनविले जात होते. फुरसुंगीतील उरुळी देवाची भागात गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त छापा टाकून हा ‘घरगुती तंबाखू कारखाना’ उद्ध्वस्त केला आहे.
या कारवाईत ५९ बॉक्स सुगंधित तंबाखू, पॅकिंग मशीन, कच्चा माल आणि अमूल कंपनीच्या नावाचे १,०८० चीजचे डबे असा ३१ लाख ९१ हजार ६०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुशिलसिंग विश्वनाथ तोमर (वय २६) आणि उमेशसिंग रामदीन तोमर (वय २३, रा. दोघेही मोरेना, मध्य प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. तर, कारखान्याचा मालक असलेला यासीन सईद खान उर्फ साजीद हा फरार आहे. दोघेही उरुळी देवाची येथील घरात राहून प्रतिबंधित तंबाखू तयार करीत होते.
साध्या तंबाखूमध्ये सुगंधित द्रव्ये मिसळल्यानंतर पॅकिंग मशीनच्या साहाय्याने त्याची पाऊचमध्ये पॅकिंग केली जात होती. तयार माल बाजारात विक्रीसाठी पाठविला जात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. उरुळी देवाची येथे सुगंधित तंबाखू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता घरातूनच तंबाखू तयार केला जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बोलावून संयुक्त कारवाई करण्यात आली. संबंधित घर पुन्हा वापरले जाऊ नये यासाठी ते सील करण्यात आले. या तंबाखूचा कच्चा माल कुठून आणला जात होता, तयार माल कोणाला पुरविला जात होता आणि अमूलच्या नावाने बनावट चीज कोठे विक्रीसाठी पाठविण्यात येणार होते, याचा तपास सुरू आहे.
गुन्हे शाखेच्या यूनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे नारायण सरकटे, पूजा बगाडे आणि नम्रता मोहिते यांनी कारवाईत सहभाग घेतला.
अमूलच्या नावाने बनावट चीज
याच कारवाईत अमूल कंपनीचे बनावट लेबल लावलेला आणि मुदतबाह्य तारखेत फेरफार केलेला ४३० किलो चीजचा साठाही जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत दोन लाख ५७ हजार १६४ रुपये आहे. मुदतबाह्य तारीख नष्ट करून त्यावर नवीन तारीख टाकण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत आढळले आहे. चीजचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.