
नगरसेवकाच्या अंगावर टँकर घालण्याचा प्रयत्न, संभाजीनगरमधील प्रकार; नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगर : तिरंगा रॅलीच्या गर्दीतून भरवेगाने आलेला महानगरपालिकेचा पाणी टँकर थांबविल्याच्या रागातून चालकाने नगरसेवकाला शिवीगाळ करत टँकर अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. टँकर अंगावर येताच नगरसेवक बाजूला सरकल्याने ते बचावले आहेत. रॅलीतील नागरिकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही घटना १४ ऑगस्ट रोजी दुपारी २.१० वाजेच्या सुमारास छञपती महाविद्यालयाजवळ घडली आहे. गणेश प्रभाकर खरात (रा. राजगनगर) असे टँकर चालकाचे नाव असून त्याच्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात प्रभाग क्रमांक २३ चे नगरसेवक प्रमोद प्रल्हाद राठोड (५०, रा. एन-३, सिडको) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे औरंगपुरा येथे जाणाऱ्या तिरंगा रॅलीतील नागरिकांना गर्दीत सहकार्य करीत होते. यावेळी महानगरपालिकेचा विना क्रमांकाचा पाणी टँकर भरवेगाने गर्दीतून येत असल्याचे दिसल्याने त्यांनी चालकाला थांबवून गर्दी असल्याचे सांगितले. यावर चालक गणेश खरात याने उद्धटपणे बोलून शिवीगाळ केली आणि टँकर राठोड यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. राठोड बाजूला झाल्याने अनर्थ टळला. त्यानंतर नागरिकांनी आरडाओरड करून टँकर थांबवून चालकाला पकडले. माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. चालक गणेश खरात (२४, रा. राजनगर, छत्रपती संभाजीनगर) याला टँकरसह ताब्यात घेतले. राठोड यांच्या फिर्यादीवरून टँकर चालक खरात याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दारू पिण्यास पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यात दगड घातल्याची घटना गुलटेकडीतील डायसप्लॉट परिसरात घडली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. राजू शिवलिंगप्पा इककळकी (वय ३०, रा. डायसप्लाॅट, गुलटेकडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रेम संजय काळे (वय २८, रा. डायसप्लाॅट, गुलटेकडी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत इककळकी याची आई लक्ष्मीबाई (वय ५८) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.