लोणावळ्यातील जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई; पोलिसांनी 4 जणांना घेतले ताब्यात
लोणावळा : लोणावळा शहर पोलिसांनी लोणावळा शहर हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर धडाकेबाज कारवाई करीत सदरचे अड्डे बंद केले आहेत. पोलिसांनी एकूण तीन मटका अड्ड्यांवर छापा टाकून ४ आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच सहा हजार चारशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याशिवाय बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई करीत त्याच्या ताब्यातील चौदाशे रुपयांच्या चाळीस मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
पोलीस निरीक्षक अरुण फुगे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलिसांनी केलेल्या कारवाई मध्ये किरण राजु जाधव (वय ३२ वर्षे,) विकास भिमाजी पैलवान (वय ३२, दोघे रा. गवळीवाडी लोणावळा), वैभव भगवान साठे (वय २५ वर्ष ,रा. ओळकाईवाडी, कुसगाव ता. मावळ जि.) आणि अशोक जगन्नाथ फाळके (रा.आण्णाभाऊ वसाहत सिद्धार्थनगर, लोणावळा) या चौघांना तीन वेगवेगळ्या अड्ड्यावर लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका नावाचा जुगार खेळताना ताब्यात घेतले. या सर्वांवर महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : सोन्याची चकाकी ठरली खोटी; बनावट दागिने देऊन 10 लाखांची फसवणूक
पुढील तपास सुरू
दुसऱ्या एका कारवाई मध्ये राजु प्रभाकर जाधव (वय ५० वर्षे, रा. गावठाण खंडाळा, लोणावळा) याला बेकायदा बिगर देशी दारू विक्री करीत असताना ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम क 65 (ई) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या सर्व कारवाईमध्ये पोलीस हवालदार राहुल पवार, पोलीस कर्मचारी रमेश उगले आणि पवन कराड आदींनी सहभाग घेतला. पोलीस हवालदार मयूर अबनावे यांनी हे गुन्हे दाखल करून घेतले. पोलीस हवालदार शकील शेख, म्हेत्रे, व पोलीस नाईक शिंदे हे पुढील तपास करीत आहे.
गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठोकल्या बेड्या
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुणे शहराच्या मध्यभागात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्या दोघांकडून ८२० ग्रॅम गांजा जप्त केला असून, युनिट एकच्या पथकाने ही कारवाई शुक्रवार पेठेत केली आहे. समाधान केदा पवार (वय ३३, रा. नाशिक), संदीप सखाराम खैरनार (वय ३८, रा. पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस अंमलदार सुजय रिसबुड व त्यांच्या पथकाने केली आहे.