
'ड्रोन' उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा
५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एस. एम. जोशी पुल परिसरातील आंदोलन सुरू असताना आकाशात एक ड्रोन विनापरवाना उडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. आंदोलनस्थळी गोपनीय माहितीसाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी युवराज टेळे यांनी मागच्या बाजूला जाऊन पाहणी केली असता, जनरेटरजवळ उभे असलेले दिगंबर खरे हे रिमोटच्या सहाय्याने ड्रोन चालवत असल्याचे स्पष्ट झाले. चौकशीदरम्यान, सदर ड्रोन उडवण्यासाठी कोणतीही कायदेशीर परवानगी घेतली नसल्याचे समोर आले, आणि आरोपी प्रमोद पाटील, शिवराज मोरे, ऋषिकेश गांगुर्डे व अक्षय कांबले यांच्या सांगण्यावरून हे चित्रीकरण सुरू असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ४० हजार रुपये मूल्य असणारा एक डीजीआई (DJI) ड्रोन कॅमेरा आणि १० हजार रुपये किमतीचा रिमोट कंट्रोलर असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अधिकृत परवानग्या आणि कागदपत्रे सादर करण्याबाबत सूचना देऊनही ती सादर न केल्याने अखेर १० ऑक्टोबर रोजी हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शोभा तेली करत आहेत. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या या बहुचर्चित आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेला हा दुसरा गुन्हा असल्याने स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी वर्तुळात आणि राजकीय पातळीवर खळबळ उडाली आहे. एकीकडे मागण्यांसाठी लढा सुरू असताना, दुसरीकडे कायदेशीर कारवाईचा ससेमिरा पाठीमागे लागल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.