
नाशिकच्या द्वारका परिसरात रक्तरंजित थरार! ३८ वर्षीय वाहनचालकाची दगडाने ठेचून हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, मयत विठ्ठल पगारे हे पेशाने खासगी वाहन चालक होते. गुरुवारी (दि. ८) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पगारे आणि त्यांचे काही मित्र घरामधे एकत्र मद्यप्राशन करत होते. दारूच्या नशेत असतानाच त्यांच्यात अचानक कोणत्या तरी कारणावरून जोरदार भांडण झाले. हा वाद विकोपाला गेल्याने संशयितांनी रागाच्या भरात पगारे यांच्या डोक्यात दगड मारून त्यांची हत्या केली आणि तेथून पसार झाले. घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पगारे यांना रात्रभर कोणतीही मदत मिळू शकली नाही. शुक्रवारी (दि. ९) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांचे भाचे निलेश भामरे हे पगारे यांच्या घरी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. भामरे यांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितांची चौकशी सुरू केली आहे.
पोलिसांकडून संशयितांची सखोल चौकशी सुरू
घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मद्यप्राशनादरम्यान झालेल्या वादातूनच ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन ते तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी हत्येचा अधिकृत गुन्हा दाखल केला जाणार आहे. तुर्तास आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.