
सासवडमध्ये पुणे ग्रामीण एटीएस पथकाची मोठी कारवाई; गंभीर गुन्हयातील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या
सासवड/संभाजी महामुनी : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एक मोठी कारवाई केली आहे. सोमवारी २२ जून रोजी सासवड येथून जबरी चोरी, खंडणी, खुनाचा प्रयत्न, आर्म ॲक्ट याप्रमाणे दाखल असलेल्या शिरूर, सासवड, जेजूरी या ३ पोलीस स्टेशनच्या गुन्हयांमध्ये फरार असलेला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. दिगंबर उर्फ दिग्या दशरथ शेंडकर (वय २८ वर्षे रा. चांबळी ता. पुरंदर) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
३ ऑक्टोबर २०२५ रोजी फिर्यादी सुरज अनिल जाधव (रा. बेलसर ता. पुरंदर) यांनी ट्रान्सफॉर्मर बंद केला नाही म्हणून त्यांना आरोपी दिगंबर शेंडकर तसेच त्याच्या ३ साथीदारांनी लोखंडी रॉड व कोयत्याने मारहाण करुन गंभीर दुखापत केली आणि तो फरार झालेला होता. त्यानंतर ९ मार्च २०२६ रोजी हॉटेल व्यवसायिक राहूल सुभाष काळे (रा. सोनोरी ता. पुरंदर) यांच्या सोनोरी येथील हॉटेलवर मालक व कामगार यांना दमदाटी, शिवीगाळ करुन लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर हॉटेलच्या काउंटरमधील ३२ हजार रुपये जबरदस्तीने नेले होते. तसेच सदर हॉटेल व्यवसायिक यांना यापूर्वीही धमकावून त्यांच्याकडून अडीच लाख रुपये खंडणी पोटी घेतले होते.
१९ मार्च २०२६ रोजी मांडवगण फराटा तालुका शिरूर येथे क्रिकेट ग्राउंडवर बॅनरवरील फोटो लावण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात फिर्यादी अमोल आनंदा चौगुले (रा. मांडवगण, फराटा) याच्यावर आरोपी दिंगबर शेंडकर व त्याच्या ६ साथीदारानी जीवे मारण्याचे उद्देशाने पिस्तुलमधून फायरींग करून पळून गेले होते. या विविध घटनांबाबत आरोपी दिगंबर शेंडकर याच्यावर जेजूरी पोलीस स्टेशनला गंभीर दुखापत, सासवड पोलीस स्टेशनला जबरी चोरी, खंडणी व शिरुर पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न, आर्म ॲक्ट याप्रमाणे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. सदर गुन्हयांमध्ये तो फरार असल्याने पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके त्याचे मागावर होती. परंतु तो वेशांतर करुन राहण्याची ठिकाणे बदलून राहत असल्याने पोलीसांना गुंगारा देत होता.
आरोपी दिगंबर उर्फ दिग्या शेंडकर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी राजगड, जेजूरी, सासवड व शिरुर पोलीस स्टेशनला खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, खंडणी, दुखापत, आर्म ॲक्ट व मोक्का या सारखे एकूण १५ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान दिगंबर शेंडकर हा अवैध अग्नीशस्त्र विक्री करणारे गुन्हेगार यांच्या संपर्कात असल्याची माहिती पुणे ग्रामीण एटीएस पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल यांनी त्याचा शोध घेणेसाठी एटीएस पथकाची नेमणूक केलेली होती. त्याप्रमाणे पथकाने त्याची माहिती काढून त्याच्यावर पाळत ठेवून वेशांतर करुन सासवड (ता. पुरंदर) येथून ताब्यात घेतले.
आरोपी दिगंबर शेंडकर याला फरार झालेल्या वेळी कोणी कोणी मदत केली ? त्याच्या संपर्कात कोण होते ? याबाबत पोलीसांकडून अधिक तपास चालू असून, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल तसेच पुणे विभाग अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार व बारामती विभाग अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, निलेश कदम, विशाल गव्हाणे, पोलीस अंमलदार मोसीन शेख, ओंकार शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.