
केतन अग्रवाल हत्या प्रकरणी मोठी कारवाई; पुणे ग्रामीण पोलिसांनी आणखी एकाला ठोकल्या बेड्या
रितेश हंगे याला शनिवारी पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रितेशला केतनच्या खुनाच्या कटाची माहिती होती, असं पोलिसांच्या तपासात उघडकीस आल्यानंतर लोणावळा पोलिसांनी रितेश हिंगेच्या मुसक्या आवळल्या आहेत. केतन अग्रवाल हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथक नेमले आहे. बीडचा रितेश हिंगे चेतन चौधरी याचा वर्गमित्र होता. सिया आणि चेतनच्या कटाबद्दल जेव्हा रितेशला कळालं तेव्हा रितेशने आरोपींना काही कल्पना दिल्याचे तपासात निदर्शनास आलं आहे. तर रितेश हिंगे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून चेतनच्या संपर्कात होता.
केतनच्या खुनानंतर चेतनने रितेशची भेट घेतली
केतनच्या खुनानंतर चेतनने रितेशची भेट घेतली होती, अशी माहिती देखील समोर आली आहे. चेतन आणि सियाने 18 जून रोजी रितेशला लोहगडावर त्यांच्यासोबत येण्यास अनेकदा सांगितलं होतं. मात्र, रितेशने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला होता. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रितेश चेतनच्या संपर्कात होता. केतनच्या खुनानंतर चेतनने रितेशची भेट घेतली होती; तर सियाही त्याच्या संपर्कात होती, असंही ग्रामीण पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे.
हिंगे मूळचा बीड जिल्ह्यातील
केतनचा किल्ल्यावरून दरीत कोसळून मृत्यू झाला होता. मात्र, हा अपघात नसून, खून असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अशातच या प्रकरणात तिसरी अटक झाल्याने प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. रितेश हिंगे हा चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचा वर्गमित्र असल्याची माहिती आहे. हिंगे मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या पुण्यातील बालेवाडी परिसरात एका खासगी कंपनीत काम करत असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, केतनच्या हत्येच्या कटाबाबत रितेशला काही माहिती होती. मात्र, त्याने हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला नाही, असा संशय आहे.