कल्याण : कल्याणमध्ये दिवसेंदिवस गुन्हे वाढत चालले आहेत. रेल्वे प्रवास करत असताना रेल्वे रुळावरून चालू गाडीतील दरवाज्यावर उभ्या असणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल हातातून खेचून चोराने अशा घटना वाढत चालल्या आहेत. कल्याणमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे तरुणाला आपले दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. ही घटना समजताच कल्याण पूर्वेचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी ठाण्यातील खाजगी रुग्णालयात धाव घेऊन त्यांची विचारपूस करीत एक लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. तसेच त्यांच्या हॉस्पिटलमधील भेटीनंतर हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने देखील मोफत उपचार करणार असल्याचे सांगितले आहे.
[read_also content=”बहिण-भावाचा निर्घृन खून, संशयिताला १० तासात घेतले ताब्यात; कारण वाचून बसेल धक्का https://www.navarashtra.com/maharashtra/murder-of-brother-and-sister-suspect-arrested-within-10-hours-nrdm-538664.html”]
कल्याण पूर्वेतील आमराई परिसरात राहणारे जगन जंगले 22 मे रोजी आपले काम आटपून रात्री 9 वाजता दादर ते कल्याण असा लोकलने आपल्या घरचा प्रवास करत होते. ट्रेन ठाणे स्टेशनवरून कळव्याच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. ठाणे प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पासून अंदाजे 200 मीटर पुढे कळव्याच्या दिशेने ट्रेन धीम्या गतीने पुढे जात असताना काही टवाळखोरांनी मोबाईल खाली पाडण्याच्या उद्देशाने दांड्याने जोरात दरवाजात थांबलेल्या जंगले यांच्या हातावर आघात केला. आघात हातावर जोरात बसल्याने तोल जाऊन ते खाली पडले. याचदरम्यान त्यांचे दोन्ही पाय ट्रेनखाली आले.
अपघातानंतर उपस्थित लोकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना आणि कुटुंबियांना माहिती दिली. पोलिसांनी त्यांना प्रथम कळवा येथील शासकीय रुग्णालयात नेले परंतु तेथे परिपूर्ण प्रमाणात उपचार नसल्याने ठाणे येथील खाजगी रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले.
जगन जंगले हे आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कल्याण शहरात येऊन भाड्याच्या घरात राहत होते. कल्याण याठिकाणी राहून दादर पश्चिम येथील एका बुक शॉपमध्ये महिना १५,०००/ पगार असणारी खाजगी नोकरी करून आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत होते. सकाळी कल्याण ते दादर आणि रात्री दादर ते कल्याण असा त्यांचा नियमितचा प्रवास होता. हल्लीच फेब्रुवारी महिन्यात त्यांचा विवाह झाला होता. सध्या त्यांच्या दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून दोन्ही पाय काढण्यात आले आहेत. परिस्थितीने अतिशय गरीब असलेल्या, नुकताच आपला प्रपंच थाटलेल्या, आपल्या कुटुंबासाठी अनेक स्वप्ने पाहिलेल्या एका गरीब युवकावर या वयात ओढवलेला प्रसंग हा खरंच मन हेलावणारा आहे. दोन्ही पाय गेल्याने आजन्म अपंगत्व आले.
[read_also content=”लोणावळ्यात नवविवाहितेची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं आयुष्य https://www.navarashtra.com/maharashtra/suicide-of-a-newlywed-in-lonavala-ended-life-by-hanging-nrdm-538638.html”]
कल्याण पूर्वचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी ठाण्यातील रुग्णालयात धाव घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कल्याण शहर कक्षप्रमुख चंद्रसेन सोनवळे, युवासेना विधानसभा अध्यक्ष अजय गायकवाड, अक्षय गाडे आदि उपस्थित होते. त्याचबरोबर पुढील उपचारासाठी मदतीचा हात म्हणून त्यांना मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून एक लाख रुपयांची मदत केली. त्याचबरोबर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीद्वारे सहकार्य केले जाणार असल्याचे यावेळी महेश गायकवाड यांनी सांगितले. महेश गायकवाड यांच्या भेटीनंतर हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक गोपाळ सिंह यांनी देखील जंगले यांच्यावर पूर्णपणे मोफत उपचार करणार असून याअगोदर जमा केलेली रक्कम देखील कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी परत करणार असल्याचे जाहीर केले. याबद्दल महेश गायकवाड यांनी देखील त्यांचे आभार व्यक्त केले.