Pune Crime News: चोरट्यांनी महिलेला चालत्या गाडीवर धक्का दिला अन्...; आळंदीतील धक्कादायक घटना
पुणे: शहरात महिला तसेच पादचारी नागरिक व ज्येष्ठांना चोरट्यांकडून लक्ष केले जात असताना चोरट्यांनी दुचाकीवर निघालेल्या महिलेला चालत्या गाडीवर धक्का देऊन त्यांच्याकडील चार लाखांचे दागिने चोरून नेले आहेत. आळंदी रस्त्यावर ही घटना घडली. या प्रकरणी ३६ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला विश्रांतवाडीतील धानोरी भागात राहायला आहेत.
महिलेच्या नात्यातील एकाचा विवाह समारंभ दिघी येथे होता. सोमवारी (१६ डिसेंबर) विवाह समारंभावरुन महिला आणि पती दुचाकीवरुन घरी निघाले होते. दरम्यान, विवाह समारंभात दागिने घालण्यासाठी त्यांनी चार लाखांचे दागिने नेले होते. विवाहात दागिने घातलेही होते. विवाह समारंभातून त्या पतीसोबत दुचाकीवर पुन्हा परत निघालेल्या होत्या. तेव्हा आळंदी रस्त्यावर बोपखेल फाट्याजवळ रात्री पावणेदहाच्या सुमारास पाठिमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी तक्रारदार महिलेकडील दागिने असलेली पिशवी चोरून नेली. चोरट्यांनी धक्का दिल्याने दुचाकीला घसरली आणि दाम्पत्य खाली पडले. सुदैवाने या घटनेत महिला आणि तिच्या पतीला गंभीर दुखापत झाली नाही. पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले तपास करत आहेत.
शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, हडपसर भागातील बंद बंगला फोडून चोरट्यांनी साडे नऊ लाखांचे ऐवज चोरून पोबारा केला आहे. बंगल्याची खिडकी उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. हडपसर भागातील मांजरी परिसरात घडली. याप्रकरणी प्रदीप कृष्णा शेवकर (वय ४७, रा. मातोश्री पार्क, मांजरी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शेवकर यांचा मांजरीतील मातोश्री पार्क परिसरात बंगला आहे. सोमवारी सकाळी शेवकर यांची पत्नी, आई आणि मुलगी सकाळी नातेवाईकांकडे गेले होते. शेवकर यांचे भाजीपाला विक्रीचे दुकान आहे. त्यांचा मुलगा हडपसर भागातील एका शाळेत आहे.
नृत्य प्रशिक्षकाचा चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वारजे माळवाडी भागातील एका नामांकित शाळेतील ३९ वर्षीय नृत्य प्रशिक्षकाने दोन चिमुकल्या विद्यार्थिंनीशी अश्लील कृत्य करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेच्या प्रशासनाला जाब विचारून कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशीरा नृत्य प्रशिक्षकावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. नृत्य प्रशिक्षक ३९ वर्षांचा असून, तो दिघी परिसरात राहण्यास आहे.
हेही वाचा: पुणे हादरलं! नृत्य प्रशिक्षकाचा चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार, पालक संतप्त
मिळालेल्या माहितीनुसार, एका पिडीत मुलगी चौथीच्या व दुसरी सहावीच्या वर्गात शिकते. शाळेत बॅड टच व गुड टच संदंर्भात एक कार्यशाळा आयोजित केली होती. त्या कार्यशाळेत मुलींनी त्यांच्यासोबत झालेल्या घटनेची माहिती दिली. नंतर शाळेने व इतरांनी या मुलींना विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर नृत्य प्रशिक्षक अश्लील कृत्य करत असल्याचे सांगितले.