पुण्यात घरफोडीच्या घटना सुरूच; 'या' भागातील फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज लांबविला
पुणे : पुणे शहरात घरफोडीच्या घटना सुरूच असून, पुन्हा चोरट्यांनी विविध भागात ३ ठिकाणी घरफोडी करून १४ लाख ४० हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. गुरूवार पेठ, विश्रांतवाडी या भागातील दोन फ्लॅट फोडण्यात आले असून, कोंढव्यातील बौद्ध विहारातील दान पेटीतून रोकड लंपास करण्यात आली आहे. या घटनांनुसार, अज्ञात चोरट्यांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार रोशणी हौसिंग सोसायटीत राहण्यास आहेत. त्या १३ ते २१ जून या कालावधीत घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. यादरम्यान, अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोंयडा तोडून आत प्रवेश केला. तसेच, बेडरूममधील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने असा ११ लाख ५१ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. तक्रारदार या शनिवारी गावावरून परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. अधिक तपास पोलीस करत आहेत.
दुसरी घटना विश्रांतवाडीतील एकतानगर येथे घडली असून, चोरट्यांनी भरदिवसा फ्लॅट फोडून २ लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदार व त्यांची पत्नी दोघेही नोकरी करतात. शुक्रवारी सकाळी ते व पत्नी नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून कपाटातून रोकड व सोन्याचे दागिने असा २ लाख ३१ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. अधिक तपास विश्रांतवाडी पोलिस करत आहेत.
दान पेटीतील रोकड पळविली
कोंढवा बुद्रुक भागातील साईनगर येथील बौद्ध विहारातील दान पेटी फोडून चोरट्यांनी ६० ते ८० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांत ६७ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञातावर गुन्हा नोंद केला आहे. साईनगरमध्ये बौद्ध विहार आहे. चोरट्यांनी विहारमधील दान पेटीची कडी तोडून आतील ६० ते ८० हजार रुपयांची रक्कम चोरून नेली आहे.