पुण्यात लुटमारीच्या घटना वाढल्या; चोरट्यांनी एकाला रस्त्यात अडवले अन्...
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोरेगाव पार्क परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन दुचाकीस्वारांना धमकावून लुटल्याची घटना घडली. चोरट्यांनी मारहाण करुन दोघांकडील मोबाइल आणि रोकड लुटून नेली आहे.
पहिल्या घटनेतील ४७ वर्षीय व्यक्तीने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे दौंड तालुक्यातील खोंडाचीवाडी परिसरातील आहेत. ते ३ जुलै रोजी दुपारी अडीचच्या सुमारास वाडिया महाविद्यालय परिसरातून निघाले होते. त्यावेळी महावितरण कार्यालयाजवळ दुचाकीवरुन आलेल्या चार चोरट्यांनी त्यांना अडवले. त्यांना कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली. आरडाओरडा केला, तर जीवे मारू, अशी धमकी दिली. त्यांच्याकडील १० हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. पोलीस हवालदार लोणकर तपास करत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत येथील चंद्रमा हॉटेलसमोर ५० वर्षीय व्यक्तीला धमकावून त्याच्याकडील मोबाइल हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी स्वतंत्र दुसरा गुन्हा नोंदवला आहे. ही घटना १६ जून रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे. यातील तक्रारदार कोरेगाव पार्क येथून जात होते. ते चंद्रमा हॉटेलजवळ आल्यानंतर दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांना धमकाविले. त्यांच्या नाकावर ठोसा मारुन कोयत्याचा धाक दाखविला. त्यांना धमकावून रोकड व मोबाइल असा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले. पोलीस हवालदार बडे तपास करत आहेत.
मोटारीची काच फोडून लॅपटाॅप चोरी
क्वीन्स गार्डन परिसरात कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप चोरल्याची घटना घडली आहे. याबाबत ४७ वर्षीय कार चालकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार विश्रांतवाडीतील धानोरी भागात राहायला आहेत. रविवारी (६ जुलै) ते दुपारी सव्वाबाराच्या सुमारास क्वीन्स गार्डन भागात आले होते. त्यांनी कार विधानभवन परिसरातील एका गल्लीत लावली होती. कारमध्ये लॅपटॉपसह इतर वस्तू होत्या. दरम्यान अज्ञात चोरट्याने कारची काच फोडली. तर आतील ३५ हजारांचा लॅपटाॅप, तसेच लेझर मेजरिंग टेप असा मुद्देमाल चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.