
एसटीत गुंडगिरी, धावत्या बसमध्ये चालकाला दांडक्याने मारहाण; VIDEO व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार , एमएच १४ एलएक्स ६०६५ या क्रमांकाच्या परळ आगाराच्या बसमध्ये १८ प्रवासी प्रवास करत होते. चालक भरत पांडुरंग बुगदे आणि वाहक अमित करपे परळहून मंचरच्या दिशेने जात असताना खेड घाटात एका थार चालकासोबत साईड देण्यावरून वाद झाला. थार चालक निघून गेल्यानंतर काही वेळातच तिथे उपस्थित दोन दुचाकीस्वारांनी बसचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला आणि चालकावर लाकडी दांडक्याने हल्ला चढवला. प्रवासी रफिक मोमीन यांनी भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही धक्काबुक्की करण्यात आली.
प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
बस वाहकाने चालकाला बस मंचर पोलीस ठाण्यात नेण्याचा सल्ला दिल्यानंतर चालकाने बस पुढे नेली. मात्र मंचर एस टी बस स्थानकात पोहोचताच २० ते २५ जणांचे टोळके बसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागले. परिस्थिती बिघडू नये म्हणून बस पोलीस ठाण्यात नेण्यात आली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, हा वाद परस्पर सामंजस्याने मिटवला असल्याचे मंचर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी स्पष्ट केले. तथापि व्हिडिओ व्हायरल झाल्याने हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाईची मागणी वाढत आहे.