गुंतवणुकीवर नफा देण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक; तब्बल 'इतक्या' कोटींना घातला गंडा
पुणे : राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आमच्याकडे सरकारी टेंडर घेण्याचा परवाना आहे. त्यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे सांगत एका व्यक्तीची दोघांनी ३ कोटी ९ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.
याप्रकरणी मोहित ढाकण (रा. मुंबई) यांनी मार्केटयार्ड पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिासांनी करण दिलीप बोथरा, सोम्या करण बोथरा (रा.सॅलीसबरी पार्क) या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार ढाकण हे दुबई येथे असतात. त्यांच्या एका नातेवाईकाच्या माध्यमातून आरोपी बोथरा यांच्यासोबत त्यांचा परिचय झाला होता. त्यावेळी दोघांनी आपल्याकडे सरकारी टेंडर घेण्याचा परवाना आहे. सरकारी टेंडरद्वारे आपण मोठा नफा कमावितो असे ढाकण यांना सांगितले. त्याबाबतचे काही फोटो देखील आरोपीनी त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी दाखविले. सरकारी टेंडरमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळतो असे सांगितले होते.
दोघांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत ढाकण यांनी सुरुवातीला ५० लाख रुपये दुबई येथे दोघांना दिले. त्यावर साडेसात टक्के नफा आरोपींनी त्यांना दिला. नंतर आरोपींनी त्यांच्याकडून वेळोवेळी गुंतवणूकीच्या नावाखाली ३ कोटी ९ लाख रुपये घेतले. त्यासाठी ढाकण यांना चेक आणि काही करार करून दिले होते. ठराविक कालावधी पुर्ण झाल्यानंतर ढाकण यांनी आरोपींकडे नफा मागितला. त्यावेळी त्यांना आज-उद्या अशी उत्तरे दिली. ढाकण यांनी आरोपींनी त्यांना दिलेले चेक बँकेत टाकले असता, ते देखील बाऊन्स झाले. आरोपींनी ढाकण यांना नोटरी देखील बनावट करून दिल्याचे पुढे आले.
दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मार्केटयार्ड पोलिसांत करण आणि सोम्या बोथरा या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक दत्तात्रय वाघमारे करीत आहेत.
गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांची फसवणूक
पुणे शहरात सायबर चोरट्यांकडून फसवणूकीचे प्रकार सुरूच असून, त्यातच गेल्या काही दिवसाखाली शेअर मार्केटमधील गुंतवुणकीच्या बहाण्याने दोघांना तब्बल ४६ लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.