
पुण्यात गुंडाराज ! पोलिसाला काठीने बेदम मारहाण; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
लॉ कॉलेज रस्त्यावर ही घटना घडली. मारहाण करणारे पसार झाले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. अमोल काटकर (वय ३८, रा. बाणेर) असे जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात अज्ञात दोन दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, काटकर हे शहर पोलिस दलात पोलिस कर्मचारी असून, त्यांची नेमणूक गुन्हे शाखेच्या युनिट तीनमध्ये आहे. रात्री एकच्या सुमारास ते कामावरुन घरी निघाले होते. लॉ कॉलेज रस्त्याने दुचाकीने जात असताना त्यांचा दुसऱ्या दुचाकीला धक्का लागला. त्यावरून त्यांच्यात वादविवाद झाले. काटकर हे साध्या गणवेशात होते. दुचाकीस्वारांनी त्यांनाच दादागिरी करत त्यांच्याशी वाद घालून त्यांना काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर दोघेही घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर या घटनेची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी दाखल होत काटकर यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या मदतीने पसार झालेल्या टोळक्याचा शोध सुरू केला आहे. सायंकाळपर्यंत त्यांचा थांगपत्ता लागलेला नव्हता. अधिक तपास पोलिस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : सायबर चोरांचा डिजिटल हल्ला ! नऊ महिन्यांत अब्जावधींची लूट; धक्कादायक आकडेवारी समोर
घरात घुसून केला तरुणाचा खून
रांजणगाव एमआयडीसी परिसरात किरकोळ वादातून घरात घुसून हल्ला करत तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील पसार झालेल्या दोघांना केवळ दोन तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ओंकार सिताराम वाळके आणि विजय ज्ञानेश्वर जगधने (दोघेही रा. कोरेगाव, ता. शिरूर) अशी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या देखरेखीखाली करण्यात आली आहे.