मुकादमाने केली ऊस वाहतूकदाराची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
कुर्डुवाडी : ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून मुकादमाने ऊस वाहतूकदाराकडून ७ लाख ८० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ऊस वाहतूकदार रामचंद्र सीताराम चव्हाण (रा. चोभे पिंपरी, ता. माढा) यांनी कुर्डुवाडी पोलिसांत उसतोड मुकादम संजय मानसाराम निकम (रा. खामखेडा, ता. देवळा, जि. नाशिक) याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी उस वाहतूकदाराने सन २०२४-२५ च्या गळीत हंगामात कारखान्याला ऊस वाहतूक करण्यासाठी आपला ट्रॅक्टर लावला होता. त्यासाठी त्याने कारखान्याकडून ४ लाख रुपये उचल घेतली होती. ऊस वाहतूकदाराला ट्रॅक्टरवर उसतोडणी कामगार हवे असल्याने त्याने त्याच्या ओळखीचे मुकादम संजय मानसाराम निकम याच्याशी बोलणी करुन १० काेयते व २० मजूर पुरविण्यासाठी ७ लाख ८० हजार रुपये ठरवून नोटरी करण्याचे ठरवले.
नोटरीपूर्वी अगोदर उचल म्हणून मुकादमाने काही रक्कम मागितल्यामुळे ऊस वाहतूकदाराने २ लाख रुपये रोख त्याच्या गावी चोभे पिंपरी (ता. माढा) येथे दिले. त्यानंतर तो गावाकडे निघून गेला होता. फिर्यादीने मुकादम संजय निकम याला नोटरीसाठी कुर्डुवाडी येथे बोलावून घेऊन दिनांक २३/५/२४ रोजी साक्षीदारासमक्ष नोटरी केली व मुकादम संजय निकम याला आरटीजीएस व फोन पेद्वारे त्याचा मुलगा योगेश संजय निकम याच्या बँक ऑफ महाराष्ट्र भोर शाखा (ता. देवळी) च्या खात्यावर २ लाख ६४ हजार रुपये पाठविले. तो कारखाना सुरू होण्याअगोदर तुमच्याकडे ऊसतोड मजूर घेऊन येतो, असे सांगून गावी निघून गेला. मुकादमाच्या मागणीनुसार कामगार अरूण पवार याच्या खात्यावर तक्रारदारांचा मावस भाऊ भीमराव जाधव याच्या बँक खात्यावरून आरटीजीएसद्वारे ५० हजार रुपये पाठविले.
कारखाना चालु झाला तरी मजूर आले नाहीत
मुकादमाने कामगाराबरोबर नोटरी करायची आहे. तुम्ही आणखी पैसे द्या, असे म्हणाल्याने फिर्यादी व विनोद हागरे असे त्याच्या गावी गेले. त्यावेळी मुकादमास २ लाख ६६ हजार रूपये दिले. कारखाना चालू झाला तरी मुकादमाने उसतोड मजूर पाठविले नाहीत. याबाबत मुकादमाला फोन करून विचारणा केली असता त्याने मतदान झाल्यानंतर मजुरांसह तुमच्याकडे येतो, असे सांगितले. परंतु मुकादम कारखाना चालु झाला तरी आला नाही. ऊसतोड मजूर पाठविले नाहीत, म्हणून फिर्यादी मुकादमाच्या गावी खामखेडा (ता. देवळी, जि नाशिक) येथे गेले असता तो घरी मिळून आला नाही. तेंव्हा त्यांची फसवणूक झाली असल्याची खात्री झाली.