मुलीला थार गाडीत नेलं, गोळ्या खायला दिल्या अन्...; साताऱ्यातील संतापजनक प्रकार
सातारा : राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता साताऱ्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. सातारा शहरात शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर ओळखीचा गैरफायदा घेऊन अत्याचार केल्याचे समाेर आले आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करुन संशयिताला अटक केली आहे. अनिल विष्णू कोकाटे-पाटील (रा. सावित्री पार्क वारणानगर, ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
पीडित मुलगी १५ वर्षांची आहे. जुलै २०२५ मध्ये तक्रारदार मुलीची तिच्या मैत्रिणीच्या ओळखीतून संशयित अनिल कोकाटे याच्याशी ओळख झाली. यावेळी आरोपीने पीडित मुलीचा मोबाईल क्रमांक घेऊन फोन करण्यास सुरुवात केली. पीडित मुलीच्या वडीलांनाही फोन करुन घरगुती संबंध वाढवले. दिनांक ४ ऑगस्ट रोजी पीडित मुलीला संशयित अनिल कोकाटे भेटला. जबरदस्तीने मुलीला थार गाडीत बसवून ड्रेस घेण्यासाठी घेऊन गेला. या घटनेने मुलगी घाबरली. ओळखीचा गैरफायदा घेवून संशयिताने मुलीवर अत्याचार केला. संशयिताने याबाबत वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर संशयिताने मुलीला आयफोन भेट दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कुटुंबीयांनी मुलीला शहर पोलिस ठाण्यात नेऊन संशयिताविरुध्द तक्रार दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयिताला अटक केली.
हे सुद्धा वाचा : पुण्यात गुंडाराज ! पोलिसाला काठीने बेदम मारहाण; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
जबरदस्तीने गोळ्या खायला द्यायचा
पीडित मुलगी साताऱ्यात शिक्षणासाठी राहात होती. संशयित अनिल कोकाटे याची तिच्याशी ओळख झाली. या ओळखीतून त्याने गैरप्रकार केला असल्याचे समोर आलेले आहे. संशयित पीडित मुलीच्या मैत्रिणीचा नातेवाईक आहे. त्याने तीनवेळा मुलीवर अत्याचार केला. अत्याचारानंतर संशयिताने मुलीला जबरदस्तीने गोळ्या खायला दिल्या असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस
पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. खराडी भागातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या आयटी इंजिनिअर महिलेचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहकारी असलेल्या वरिष्ठावर गुन्हा दाखल केला. याबाबत ३४ वर्षीय महिलेने खराडी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील वरिष्ठ सहकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराडी येथील एका आयटी कंपनीत संबंधित महिला काम करते. आरोपी या कंपनीतील ‘टिम लिडर’ आहे.