
काँग्रेस नेत्याच्या बंगल्यातून चोरी; पत्नीला चाकूचा धाक दाखवला अन्...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडहिंग्लज गावापासून गिजवणे गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी जैन वस्ती असून पाटील यांचा कृष्णाई बंगला आहे. या बंगल्यात पती-पत्नी दोघेच राहतात. तर त्यांचा मुलगा डॉक्टर सतीश हा बेळगाव येथे राहतो. डॉक्टर सतीश व त्यांचा मित्र शुक्रवारी (दि. ७) सकाळी घरी आले होते. त्यानंतर मुलगा बेळगावला गेला व पाटील पेट्रोल पंपाकडे सायंकाळच्या सुमारास गेले. अक्कामहादेवी घरी एकट्यात होत्या.
कुरियर देण्याच्या बहाण्याने प्रवेश
यादरम्यान कुरियर देण्याच्या बहाण्याने एक तरुण पाटील यांच्या बंगल्यात घुसला. अक्कामहादेवी घराची कडी काढून पहात असताना या तरुणाने घरात तत्काळ प्रवेश करत दरवाजा बंद केला. यावेळी त्यांनी अक्कामहादेवी यांचे तोंड दाबले आणि चाकूचा धाक दाखवत गप्प बसण्यास सांगितले. चोरट्याने अक्कामहादेवी यांच्याकडे चावीची मागणी केली. त्याने चाकूचा धाक दाखवून कपाटात ठेवलेले पंधरा हजार रुपये रोख रक्कम आपल्या पिशवीत घातली. त्यानंतर दागिने कुठे आहेत, अशी विचारणा करत चाकूने वार केला. यामध्ये त्या गंभीरित्या जखमी झाल्या.
बाहेरून कडी लावत गाडीवरून पलायन
सुमारे अर्धा तास चोरटा घरातच होता. त्यानंतर त्याने बंगल्याच्या बाहेर येत बाहेरून कडी लावत गाडीवरून पलायन केले. जैन समाजाचे गावात गेली आठ दिवस सिद्धचक्र पर्व सुरू आहे. गडहिंग्लज बांदा महामार्गावर सात वाजता रथ यात्रा सुरू हाेती. यात सर्व ग्रामस्थ सहभागी झाले होते. मात्र या गल्लीत सामसूम होती. पती घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला.