
सायबर चोरट्यांकडून तिघांची फसवणूक; तब्बल 33 लाखांना घातला गंडा
याप्रकरणी विश्रांतवाडी येथील एका नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार, विश्रांतवाडी पोलिसांत सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची १९ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे विश्रांतवाडीत राहतात. सायबर चोरट्यांनी मोबाइलवर मॅसेज पाठवून ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. नंतर त्यांना एक काम दिले. हे काम पूर्ण केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला. परतावा मिळाल्याने तक्रारदाराचा विश्वास बसला. चोरट्यांनी त्यांना ऑनलाइन कामात पैसे गुंतविल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्यांनी चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी १९ लाख १२ हजार रुपये जमा केले. रक्कम जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. वरिष्ठ निरीक्षक मंगेश हांडे तपास करत आहेत.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची सायबर चोरट्यांनी ६ लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत महिलेने तक्रार दिली आहे. वरिष्ठ निरीक्षक भाऊसाहेब पाटील तपास करत आहेत. आणखी एका प्रकरणात देखील शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने पर्वती येथील एकाची चोरट्यांनी ७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पोलिस उपनिरीक्षक कोपनर तपास करत आहेत.