
5 कोटी रुपये द्या, नाहीतर...; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून तरुण व्यवसायिकाला धमकी
घाबरलेल्या व्यापाऱ्याने अखेर स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार नोंद होताच पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला आहे. कॉलची सत्यता, टोळीशी असलेला संबंध आणि तांत्रिक बाबी तपासण्यासाठी सायबर तज्ज्ञांसह चार स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासात कॉल परदेशातील एका ओळखीच्या बेटावरील लोकेशनवरून आल्याचे संकेत मिळाले असून, प्रकरणाला आंतरराष्ट्रीय डिजिटल गुन्हेगारीचा धागा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संशय वाढवणारी पार्श्वभूमी
याआधी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली होती, जो तुरुंगात असताना बिश्नोई टोळीच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. सायबर फॉरेन्सिक, आर्थिक व्यवहार आणि टोळीशी संबंधित माहितीचा सखोल तपास सुरू आहे. लक्ष्य केलेला व्यापारी चित्रपट व दूरदर्शन क्षेत्रात ओळखीचा असल्याचे सांगितले जात असून, बॉलिवूड व राजकीय क्षेत्रातील काही व्यक्तींशी त्याचे व्यावसायिक संबंध असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. २००६ साली या भागात खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण व हत्या झाल्याची घटना लक्षात घेता पोलिस अत्यंत सावधगिरीने तपास करत आहेत. राज्य व केंद्र सरकारच्या यंत्रणांनाही सतर्क करण्यात आले आहे.