संग्रहित फोटो
पालघर : राज्यासह देशभरात लुटमारीच्या घटना वाढल्या असून, अशातच आता पालघर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मोखाडा पोलिस ठाणे हद्दीतील चास पैकी चिकनपाडा येथे मध्यरात्री ६ ते ७ अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून दाम्पत्याला धाक दाखवत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २० ऑगस्ट रोजी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
२० ऑगस्ट रोजी रात्री १२.५० वाजण्याच्या सुमारास घराचा दरवाजा ठोठावल्याचा आवाज आल्याने फिर्यादी यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी ६ ते ७ अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश केला. त्यांनी हातात पांढऱ्या रंगाचे हातमोजे घातले होते. त्यापैकी काही जणांनी फिर्यादी यांना पलंगावर पकडून ठेवत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतली. त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्रही जबरदस्तीने ओढून घेतले. इतर आरोपींनी घरातील पत्र्याच्या पेट्या उघडून त्यामधील रोख रक्कम व सोन्याचे दागिने ताब्यात घेतले आणि घटनास्थळावरून पसार झाले. या दरोड्यात सुमारे २ तोळे वजनाची सोन्याची चैन (किंमत १ लाख रुपये), १.५ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत ७५ हजार रुपये) आणि २ लाख रुपये रोख, असा एकूण ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. या प्रकरणी मोखाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत असून, उपलब्ध तांत्रिक व भौतिक पुराव्यांच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अजित साबळे करत आहेत.
हे सुद्धा वाचा : शिरूर हादरलं! नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; हॉटेलमध्ये नेले अन्…






